Spread the love

जळगाव / महान कार्य वृत्तसेवा

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथे राहणाऱ्या 26 वर्षीय विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची या तरुणाची सोमवारी पहाटे निर्घृण हत्या करण्यात आली. वीज खंडीत झाली म्हणून तक्रार करण्यासाठी जात असताना 6 ते 7 जणांनी विशालला गाठलं. पाठलाग करून त्याची हत्या केली. या घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेलं. दीक्षित वाडी शेजारील महावितरण कार्यालयाजवळ पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा प्राणघातक हल्ला झाला होता. जुन्या वैमनस्यातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 13 वर्षांपूर्वी झालेल्या वादाचा आता बदला घेतल्याचं सांगितलं जातंय. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

घटना कशी घडली?

फिर्यादी आकाश जनार्दन मोची याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो आणि त्याचा चुलत भाऊ विशाल मोची हे काशीबाई उखाजी शाळेजवळील वेल्डिंग दुकानात काम करतात. रविवारी रात्री उशिरा, आकाश, विशाल आणि त्यांचा मित्र रोहित भालेराव हे आकाशच्या घरासमोर गप्पा मारत होते. त्या दरम्यान अचानक वीजपुरवठा खंडीत झाला.

वीजपुरवठ्याबाबत तक्रार करण्यासाठी तिघेही मोटारसायकलवरून दीक्षित वाडीतील महावितरण कार्यालयाकडे निघाले होते. पहाटे तीन वाजेच्या सुमारास जिम समोरून जात असताना, भूषण मनोज अहिरे, पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर, आकाश उर्फ खंड्या सुखलाल ठाकूर व त्यांचे सहा ते सात साथीदार वाढदिवस साजरा करत उभे असल्याचे दिसले. विशाल आणि त्याच्या मित्रांना पाहताच या टोळक्याने त्यांचा पाठलाग सुरू केला. भीतीने आकाश आणि रोहित पळू लागले, मात्र आरोपींनी त्यांनाही पकडून मारहाण केली.

महावितरण कार्यालयाच्या गेटजवळ पोहोचताच टोळक्याने विशालला मोटारसायकलवरून खाली ओढले. आरोपी भूषण, बद्या आणि खंड्या यांनी धारदार चाकू काढत एकामागून एक गंभीर वार केले. तर इतर साथीदारांनी लाथाबुक्क्‌‍यांनी मारहाण केली. हल्लेखोर ”आम्ही भूषणचे साथीदार आहोत. आमच्यावर एमपीडीए लावता का? मारूनच टाकतो” असे ओरडत होते. या दरम्यान विशालच्या मानेवर, छातीवर आणि डोक्यावर सलग वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात विशाल कोसळला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.

आकाश मोचीच्या फिर्यादीनुसार, आरोपींशी त्यांचा 2012 साली वाद झाला होता. त्यानंतरपासून दोन्ही गटांमध्ये राग आणि दुरावा वाढला होता. विशाल मोची आणि त्याचे मित्र आकाश व रोहित यांच्याशी आरोपींचे जुने शत्रुत्व कायम होते. याच वैमनस्यातून हा निर्घृण खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.