मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मुंबईसह उपनगरात पहाटेपासून आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळतो आहे. मुंबईतील अनेक शहरांमध्ये गुडघाभर, कंबरभर पाणी साचलं आहे. काही बिल्डिंगमध्ये देखील पाणी शिरलं आहे. कळबा मुंब्रा, ठाणे, भांडूप कल्याण परिसरातही पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जिथे असाल तिथेच सुरक्षित ठिकाण पाहून थांबा कुठेही बाहेर जाण्याची रिस्क घेऊ नका. पुढचे 4 तास अत्यंत धोक्याचे आहेत.
11.30 वाजण्याच्या सुमारास समुद्राला भरती येणार आहे. त्यामुळे कोणीही समद्रकिनाऱ्यावर जाऊ नये असं आवाहन केलं आहे. शासकीय आणि निम शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. खासगी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याच्या सूचना द्याव्यात असे सांगितले आहे. शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली असून परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत. आभाळ फाटल्यासारखा पाऊस पहाटे 4 वाजल्यापासून सुरू आहे.
मुंबईतील थ्ँए मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अंधेरी सबवे देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुढचे चार तास धोक्याचे असणार आहेत. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. मुंबईसह उपनगरात आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. 24 तासांसाठी हा रेड अलर्ट असणार आहे. अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस पडत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
पुढच्या 4 तासात 50-60 किमी प्रति तास वेगानं सोसाट्याचा वारा सुटणार असून अति मुसळधार पाऊस राहील. याशिवाय व्हिजिबलीटी देखील कमी राहील असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. लोकल मार्गावर देखील पाणी साचल्यामुळे लोकल 1 तास उशिराने धावत आहेत. वडाळ्यात कंबरेएवढं पाणी भरलं आहे. मुंबईकरांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात जाऊन मुंबई शहर आणि परिसर तसंच राज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना केल्या. मुंबईत पहाटे 4 ते सकाळी 8 या चार तासांत मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरातील चिंचोली, वर्सोवा आणि दिंडोशी भागात 90 ते 107 मिमी पाऊस झाला, तर शहर भागात दादर, वडाळा आणि परळ परिसरात 889 ते 109 मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरात मुलुंड, चेंबूर आणि विक्रोळी परिसरात 87 ते 100 मिमी पाऊस झाला आहे. आता पुन्हा एकदा 4 तास धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे.
