संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगरला हादरवून सोडणारा प्रकार समोर आला आहे. मागील 19 दिवसांपासून बेपत्ता असलेली 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला आहे. गोदापात्रात या तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. छावा संघटनेतच काम करणाऱ्या प्रदेशाध्यक्ष महिलेने प्रेमात अडसर ठरतो म्हणून भाऊ आणि मित्राच्या मदतीने तरुणाचा खून केल्याचा आरोप केला जात आहे. एखाद्या वेबसिरीजला शोभेल असा थक्क करणारा घटनाक्रम समोर आला आहे.
कोण आहे आरोपी?
पोलिसांना 19 दिवसांनंतर सापडलेला मृतदेह हा सचिन अवताडे नावाच्या तरुणाचा असून तो 32 वर्षांचा असल्याची माहिती समोर येत आहे. तो हर्सूलला राहायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणामधील मुख्य आरोपी महिलेचं नाव भारती दुबे असं असून ती कॅनॉट प्लेस येथे वास्तव्यास होती. भारतीला तिचा मामेभाऊ दुर्गेश तिवारीने सचिनची हत्या करण्यासाठी मदत केल्याचं समोर आलं आहे.
नेमकं घडलं काय?
भारती ही पतीपासून विभक्त झाल्यानंतर कॅनॉट प्लेस येथे राहते. भारती व सचिन हे दोघे चार वर्षापासून छावा संघटनेत काम करत होते. त्यांची या काळातच दोघांची ओळख झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. 31 जुलै रोजी दोघांनी दारू खरेदी केली. कॅनॉट प्लेस येथील फ्लॅटवर गेले. तिथे भारतीचा मामेभाऊ दुर्गेश आला होता. त्यानंतर मित्र अफरोज देखील या फ्लॅटवर आला. याचदरम्यान या चौघांमध्ये मोठा वाद झाला. सचिनविरुद्ध सगळे असा हा वाद सुरु असतानाच अचानक या तिघांनी सचिनवर हल्ला केला. तिघांनी मिळून सचिनला बेदम मारहाण करत चाकूने हल्ला केला.
नातेवाईकांनी भरपूर शोधलं पण…
दुसरीकडे सचिन 31 जुलैपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. त्याच्या नातेवाईकांनी आधी त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. सचिनला शोधण्यात अपयश आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. 13 ऑगस्ट रोजी शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे गोदावरी पात्रात एक मृतदेह आढळला. मृतदेहाच्या मानेवर व हातावर असलेल्या टॅटूवरून हा मृतदेह सचिनचाच असल्याची खात्री पटली.
कसे सापडले आरोपी?
सचिन बेपत्ता झाल्यापासून भारतीही फ्लॅटवरून पळून गेली होती. पोलिसांनी 80 सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यापैकी एकामध्ये तिन्ही आरोपी ताडपत्रीमध्ये मृतदेह घेऊन जाताना कैद झाल्याचं स्पष्ट झालं. भारती बुलढाण्यातील साखरखेर्डात लपून बसल्याची माहिती पोलीस निरीक्षक वाघ यांना मिळाली. पथकाने रात्री शेतातून भारतीला ताब्यात घेतले. पोलिसांनी विचारपूस केली असता प्रेमसंबंधातील वादातून दुर्गेश व अफरोज यांच्या मदतीने सचिनचा खून केल्याची कबुली भारतीने दिली आहे. भारतीला न्यायालयासमोर हजर केलं असता तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आलं आहे.
