Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने राज्यभरात 12 जणांचा मृत्यू झालाय . यात नांदेड जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थितीमुळे 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली .  कोकण, मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी झाली असून पिकं पाण्याखाली गेली आहेत . आठवड्याच्या सुरुवातीलाच झालेल्या बेफाम पावसाने नोकरदारांची दैना झाल्याचं दिसून आलं .  मराठवाड्यात पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या पावसाने अनेक गाव जलमय झाली असून  ढगफुटीसदृश्य पावसामुळे शेकडो जनावरांचा मृत्यू झालाय .अनेकांची घर पाण्याखाली गेली आहेत . नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे .

नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनली होती. ढगफुटी सदृश्य परिस्थितीत तब्बल 9 जणांचा मृत्यू झाला. मात्र सध्या नांदेडमधील पाऊस ओसरला असून परिस्थिती सामान्य होत आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, जेवणखाण्याची व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास लष्कराची मदत घेतली असल्याचंही मंत्री महाजन यांनी सांगितलं.

प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे

मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. एका व्यक्तीचा भिंत पडून मृत्यू झाला आहे. मिठी नदी सध्या 4.9 मीटरवर असून ती धोक्याच्या पातळीवर (3.9 मी.) पोहोचली आहे. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. पालिका प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, कोकणपट्ट्‌‍यातही पावसाचा जोर कायम असून रायगड जिल्ह्यातील अंबा नदी व रत्नागिरीतील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कोकणासह रायगड, मुंबई परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत रेल्वे सेवा विस्कळीत

मुंबईत रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे काही प्रमाणात सुरू असली तरी हार्बर मार्गावर पाणी शिरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत हायटाईड ओसरल्यानंतर परिस्थिती सुधारेल, अशी शक्यता आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना सावधगिरीचे आवाहन केले आहे. ”कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. पर्यटन टाळावे. जीव धोक्यात घालून बाहेर पडू नका. सर्व यंत्रणा सज्ज असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. घाबरून जाण्याचे कारण नाही,” असे ते म्हणाले.

मुंबई उपनगरांत मागील 24 तासात अतिवृष्टीची नोंद मुंबई उपनगरांत मागील 24 तासात अतिवृष्टीची नोंद  झाली आहे. विक्रोळी परिसरात सर्वाधिक 255.5 मिमी पाऊस झाला आहे.ही माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. सोबतच, भायखळा, सांताक्रुज, जुहू, वांद्रे परिसरात अतिवृष्टी झाली आहे. पुढील 24तासात पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. ठाणे- कळवा -मुंब्रा खाडीला भरतीला सुरुवात झाली आहे. सतत दोन दिवसात पडत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. ठाण्याला लागूनच असणारा कळवा खाडी आणि मुंब्रा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाडीला भरतीला सुरुवात झाली असून खाडीकिनारी असणाऱ्या बोटीला प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.