इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी शहर आणि परिसरात सोमवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. रविवार संध्याकाळपासूनच पावसाची हलकी सर सुरू झाली होती. त्यानंतर संपूर्ण रात्री व सोमवार सकाळपर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. मात्र दुपारी चार वाजल्यानंतर पावसाने जोर धरला, पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले, तर अनेक भागांत वाहतुकीवर परिणाम झाला.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील काही भागांमध्ये पाणी साचून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. बाजारपेठ, मुख्य चौक, शहरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने वाहनचालक आणि पादचारी यांचे हाल झाले, पावसामुळे दैनंदिन कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले होते. कार्यालयातून परतणाऱ्या कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना प्रवासात अडचणींचा सामना करावा लागला. सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता.
