छत्रपती संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा
मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातलाय. अनेक धरणे फुल्ल झाली आहेत. लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिवसह बहुतांश ठिकाणी धरणक्षेत्रात पडलॆल्या पावसाने पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण असलेले येलदरी हे पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण परिसरात सुरू असलेला पाऊस तसेच खडकपूर्णा प्रकल्पातून वाढलेली पाण्याची आवक यामुळे धरणाचे सर्व 10 दरवाजे उघडण्यात आले. दरवाज्यांमधून व जलविद्युत केंद्राच्या टर्बाइनमधून मिळून एकूण 23,800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण भरल्याने परभणी, हिंगोली, नांदेड, वसमत, पूर्णा ही 5 प्रमुख शहरे तसेच 200 खेड्यांचा पाणी प्रश्न मिटला असून जवळपास 70,000 हेक्टरवरील शेतीला याचा लाभ होणार आहे.
उदगीर तालुक्यात पुराचा तडाखा – कार वाहून गेली, शोधकार्य सुरू
उदगीर तालुक्यात रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री 9 वाजता सुरू झालेला पाऊस अद्याप सुरूच असून लेंडी नदीला पूर आल्याने धडकनाळ व बोरगाव या गावांमध्ये पाणी शिरले.
बोरगावाने अक्षरश: तळ्याचे रूप धारण केले असून गाव चारही बाजूंनी पाण्याने वेढले गेले आहे.रात्री 2 वाजल्यापासून गावकरी जागेच राहून रात्र काढली.उदगीर-मुक्रमाबाद-देगलूर रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. धडकनाळ येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.याच भागात एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती असून प्रशासन हरवलेल्या लोकांचा शोध घेत आहे.गावात पाणी शिरल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पिके आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले असून हजारो एकर जमीन खरवडून गेली आहे.
धडकनाळचे धडकी भरवणारे दृश्य
लातूर-नांदेड-कर्नाटक सीमारेषेवरील धडकनाळ गाव सध्या प्रचंड पाण्याच्या विळख्यात आले आहे.
1 किलोमीटरहून अधिक रस्ता पूर्णपणे पाण्याखाली.
उदगीर-मुक्रमाबाद-देगलूर मुख्य रस्ता धडकनाळजवळ ठप्प.
लेंडी नदीला आलेल्या तुफान पुरामुळे गावांमध्ये पाणीच पाणी.
शेतशिवारावरून गेलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे जमीन खरडून गेली आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
हे दृश्य अक्षरश: धडकी भरवणारे असून पाण्याचा जोर एवढा प्रचंड आहे की कुणालाही त्यात अडकण्याचा धोका मोठा आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पावसाचा मोठा परिणाम, वाहतूक ठप्प
लातूर जिल्ह्यातील उदगीर व अहमदपूर तालुक्यातील वाहतुकीवर पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. पुलावरून पाणी गेल्याने 5 ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
उदगीर-देगलूर मार्गावरील करजखेल पुलावरून पाणी जात असल्याने मार्ग बंद.
उदगीर-हानेगाव मार्गे हंगरगा, गळसुबाई तांडा येथील पूल पाण्याखाली.
उदगीर-होकर्णा मार्गावरील भवानी दापका पूल पाण्याखाली.
माणकेश्वर-उदगीर मार्गावरील इंद्रराळ पूल पाण्याखाली.
अहमदपूर-अंधोरी मार्ग पावसामुळे बंद.
येलदरी पाठोपाठ परभणीच्या लोअर दुधना धरणातून सोडले पाणी परभणीतील येलदरी प्रकल्पा बरोबरच सेलूच्या लोअर दुधना धरणातून ही पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.लोअर दुधना 70ज्ञब भरले असुन सध्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहे ज्यातुन 2639 क्युसेक्स वेगाने पाणी दुधना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.हा विसर्ग अजून वाढण्याची शक्यता असल्याने दुधना नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
