Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

जुन्या पिढी मधील माणसं सोनं जपून ठेवत होती. मात्र, मुंबईमध्ये आता सोन्यासारखीच किंमत घरांना आली आहे. त्यामुळे घर विकू नका, पुढच्या पीढीला हे घरं द्यायचं आहे हे लक्षात ठेवा आणि या घरांना लाडक्या बहिणींचं सुद्धा नाव लावा असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 556 सदनिकांच्या चावी प्रदान कार्यक्रमांमध्ये बोलताना केलं. 556 सदनिकांच्या चावीवाटपाचा शानदार कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी अजित पवार यांनी केलेल्या आवाहनाचा धागा जोडत म्हणाले की मुंबईमध्ये सोन्यासारखीच घरांची किंमत असून ती घरे विकू नका. अजित पवार यांनीही आपल्या भाषणांमध्ये घर विकू नका असं आवाहन केलं होतं. खऱ्या मुंबईकरांना मुंबईमध्ये आणणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. फडणवीस यांनी सांगितले की, मी म्हणालो होतो असं काम करायचं की कुणी शिव्या घातल्या नाही पाहिजेत. म्हणून ग्लोबल टेंडर करण्याचा निर्णय आपण घेतला. त्यानुसार प्रक्रिया पार पडली. टाटाने एलएनटी, शहापूरजी पालनजी यांनी कामे घेतली आणि चांगल्या प्रकारची कामे होत आहे. 22 एप्रिल 2017 ला टेंडर झालं. त्यानंतर अडचणी येत राहिल्या मात्र आपण काम करत राहिलो, असे फडणवीस म्हणाले.

खऱ्या मुंबईकरांना मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न

त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेचा किस्सा सांगत म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी पोलिसांना घर द्या म्हणून मोर्चा काढला होता. त्यांच देखील स्वप्न आम्ही पूर्ण करत आहोत. 15 लाखात आम्ही त्यांना घर देत आहोत. खऱ्या मुंबईकरांना मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आम्ही तसा निर्णय केला आहे. अभ्युदय नगर, अंधेरीतील प्रकल्प, जे बी नगर प्रकल्प देखील आपण करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

आता धारावी रिडेव्हलपमेंट प्रकल्प सुरू केला

ते म्हणाले की, धारावी संदर्भात देखील निर्णय घेत आहोत. धारावीबाबत राजीव गांधी यांनी पुनर्विकास करू असं म्हणाले होते. मात्र, पुढे काही झालं नाही. आपण आता धारावी रिडेव्हलपमेंट प्रकल्प सुरू केला आहे. 10 लाख लोकवस्तीचा आम्ही पुनर्विकास करत आहोत. एक नवीन शहर आम्ही बसवत आहोत. जो पात्र आहे त्याला नक्की घर मिळेल, असे ते म्हणाले.

झोपडपट्टी पेक्षा वाईट परिस्थिती होती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बीडीडी चाळीने सामाजिक राजकीय आंदोलने पाहिली. स्वातंत्र्याची चळवळ पाहिली आहे. 100 वर्षांचा इतिहास पाहिला तर चाळींच्या भिंतीत अनेक कथा कहाण्या आहेत. तीन चार पिढ्या इथं गेल्या आहेत. त्यामुळे चाळींचा पुनर्विकास व्हायला हवा असं आमच म्हणणं होतं. बीडीडीमध्ये माझी मोठी सभा झाली होती. त्यावेळी अनेकांच्या घरी गेलो त्यावेळी काय अवस्थेत लोक राहत आहेत हे मी पाहिलं. झोपडपट्टी पेक्षा वाईट परिस्थिती होती. महायुती सरकार आल्यानंतर मागण्या पूर्ण करण्याची वेळ आली आहे हे लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली. 90 वर्षांचे अतिक्रमण त्याठिकाणी होते ते देखील काढण्यात आलं. कोणीतरी बिल्डर याचा विकास करेल म्हणून हा प्रोजेक्ट पडून होते. त्यावेळी विकासकचा उद्देश त्याला किती विक्रीसाठी फ्लॅट मिळेल हा उद्देश होता. त्यामुळे आम्ही म्हाडाला बिल्डर केलं आणि आपण 500 चौरस फुटाचा फ्लॅट आपण दिला.