मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
ओव्हलच्या मैदानामध्ये भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या कसोटी सामन्यात झालेल्या हायव्होल्टेज सामन्यानंतर एका आठवड्याने भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने मैदानातील घडामोडींबद्दल आपले मौन सोडले आहे. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट आणि आकाश दीपमध्ये नेमके काय घडले यावर स्वत: आकाशने प्रकाश टाकलाय. मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी या दोघांमध्ये मैदानात बाचाबाचीची घटना घडली. आकाश दीपने डकेटला बाद केल्यानंतर तो मैदानाबाहेर जात असताना त्याच्या खांद्यावर हात टाकला होता. यावेळी आकाश दीप डकेटला काहीतरी सांगत असल्याचे दिसून आले. डकेटने आकाश दीपचं ऐकून घेतलं आणि तो शांत राहिला. तो आकाश दीपला काहीही बोलला नाही. मात्र या कृतीमुळे आकाश दीप अडचणीत आला असता, असं म्हटलं जात आहे.
चांगली कामगिरी करुनही…
डकेट बाद झाल्यानंतर त्याला निरोप देण्यापूर्वी दोघांमध्येही वाद झाला. दोघांमध्ये शब्दिक देवाणघेवाण झाली. आकाश दीपने आता यासंदर्भात खुलासा केला आहे की डकेटने तू मला बाद करु शकणार नाही, असं सांगितलेलं. डकेटचं हे विधान ऐकून आकाश दीप संतापला होता. विशेषत: डकेटविरुद्ध आपली सात्यतपूर्ण चांगली कामगिरी असताना तो असं बोललाच कसा याचा आकाश दीपला राग आला. ”डकेटविरुद्ध माझा रेकॉर्ड चांगला आहे आणि मी त्याला अनेकदा बाद केले आहे,” असं आकाश दीपने ‘रेव्हस्पोर्ट्झ’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
डकेटने आकाश दीपला काय म्हटलं होतं?
”मी नेहमीच डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध मला विकेट घेण्याची संधी असते असं मानतो आणि डकेट याला अपवाद नाही. त्या दिवशी तो मला माझ्या लाईन आणि लेंथपासून दूर चेंडू फेकण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने अनेक हटके शॉट्स खेळले. तेव्हा फलंदाजी करताना त्याने मला सांगितले की आजचा दिवस त्याचा आहे आणि मी त्याला बाद करू शकणार नाही, डकेटच्या रणनीतींमुळे सुरुवातीला त्याच्यासाठी गोलंदाजी करणे आव्हानात्मक होते, परंतु शेवटी ब्रेकथ्रू मिळाल्यावर मला उत्साह आला, असं आकाश दीपने प्रांजळपणे कबूल केले.
डकेटच्या कानात काय बोलला आकाश दीप? स्वत: केला खुलासा
”अगदी खरं सांगायचं झालं तर एखादा फलंदाज खेळपट्टीवर फिरला आणि असे हटके शॉट्स खेळला तर तुमच्या लाईन आणि लेंथवर परिणाम होतो, कारण तुम्हाला खरोखर ठाऊक नसते की तो पुढे काय करेल. त्यादिवशी तेच घडत होते. तसेच, इंग्लंडची सुरुवात वेगवान झाली होती आणि आम्हाला विकेटची आवश्यकता होती. आम्ही अगदीच सामान्य धावसंख्येचा बचाव करत होतो आणि विकेट अत्यंत महत्त्वाच्या होत्या. जेव्हा मी त्याला बाद केले, तेव्हा मी त्याला म्हणालो: ‘यू मीस आय हीट असं झालं हे! मी त्याला म्हटलं की, तू नेहमीच जिंकणार नाहीस. यावेळी, मी जिंकतो’. तो मला जे सांगत होता त्याचाच हा एक भाग होता. जो काही प्रकार मैदानात झाला तो सर्व चांगल्या भावनेने केलं,” असं आकाश दीप म्हणाला.
मालिकेत वादच वाद
आकाश दीप आणि बेन डकेट यांच्यात झालेला संघर्ष हा या मालिकेतील एकमेव वाद नव्हता. लॉर्ड्स कसोटीपासूनच दोन्ही संघांमध्ये मैदानात तणाव निर्माण झाला होता, जो झॅक क्रॉलीने तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जाणूनबुजून वेळ वाया घालवल्यामुळेही वाद निर्माण झाला होता. या कृत्याने भारतीय संघाला, विशेषत: शुभमन गिल फार रागावला होता. चौथ्या कसोटीपर्यंत हा संघर्ष तीव्र झाला आणि पाचव्या कसोटीपूर्वी भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ग्राउंड्समन ली कर्टिस यांच्यात जोरदार संघर्ष झाला.
