मनोज जरांगे यांचं आवाहन, धाराशिवमध्ये आतापर्यंत दहा हजार गाड्यांचे बुकिंग
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाची धाराशिवमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये चावडी बैठका घेत 29 ऑगस्टच्या आंदोलनाबद्दल मराठा बांधव जनजागृती करत आहेत. आतापर्यंत मुंबईच्या आंदोलनासाठी दहा हजार गाड्यांचं बुकिंग झाल आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (श्रहदर व्रीरहुा झ्रूग्) यांचा फोटो असलेले आणि त्यावरती चलो मुंबई अशा आशयाचे बॅनर आणि पोम्प्लेट छापण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या गाठीभेटी दौऱ्यानंतर मराठा कार्यकर्त्याकडून चावडी बैठकांमधून समाजजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याचा 29 ऑगस्टला मुंबईत पुन्हा एकदा मराठयांचा एल्गार पाहायला मिळणार असल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये चावडी बैठकींचे आयोजन करण्यात येत असून, या माध्यमातून समाज एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. याच अनुषंगाने नुकतीच धाराशिव शहरात बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत राजकीय नेत्यांना इशारा दिला आहे. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, जो नेता 29 ऑगस्टला मुंबईच्या आंदोलनात सहभागी होणार नाही, त्याला आगामी नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकांमध्ये पाडा, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे. मनोज जरांगे यांच्या वक्तव्याने राजकीय वतुर्ळात चर्चांना उधाण आले आहे. तर 29 ऑगस्टच्या मुंबई येथील आंदोलनामध्ये मराठा बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
