महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, हर्षीलमधील 11 पर्यटकांसाठी एअर लिफ्ट
उत्तरकाशी / महान कार्य वृत्तसेवा
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील 172 पर्यटक या परिसरात अडकले होते. त्यापैकी 171 पर्यटकांशी संपर्क साधला असून ते सुरक्षित आहेत. एक पर्यटक श्रीमती कृतिका जैन यांचा शोध सुरू असून, त्यासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंडला सूचना देण्यात आल्या आहेत. या परिसरात अडकलेल्या 171 पर्यटकांपैकी 160 पर्यटक (31 मातली, 6 जॉली ग्रॅन्ट तसेच 123 उत्तरकाशी) येथे सुखरुप आहेत. सुरक्षित पर्यटकांनी त्याच्या नियोजित कार्यक्रमानुसार पुढील प्रवास सुरु केला आहे. 11 पर्यटक हर्षील येथे सुरक्षित असून संचालक (आपत्ती व्यवस्थापन), उत्तराखंड यांच्या अहवालानुसार, हर्षील येथे थांबलेल्या पर्यटकांना आज सकाळी 6 वाजता हेलिकॉप्टरने हलविण्याचे कार्य सुरू झाले आहे.
त्यांना एअर लिफ्ट करुन सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्र उत्तराखंड, जिल्हा नियंत्रण कक्ष, उत्तरकाशी तसेच राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र (ऱ्एींण्), नवी दिल्ली यांच्याशी सतत संपर्कात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उत्तरकाशी येथे घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच मुख्य सचिव, महाराष्ट्र यांनी अपर मुख्य सचिव (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग) यांच्यासह आढावा घेतला असून उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद बर्धन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मदत करण्याची विनंती केली.
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन व पूर परिस्थितीत लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक बचाव पथके धराली येथे कार्यरत आहेत. संपर्क यंत्रणा अंशत: सुरू झाल्या असल्या तरी रस्ते अद्याप पूर्ववत नाहीत. पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उत्तराखंडमधील आपत्ती बचाव कार्यासाठी जबाबदार अधिकारी पोलीस महानिरीक्षक राजीव स्वरूप यांच्या माध्यमातून उपग्रह फोन तैनात करण्यात आले असून, लष्कराच्या छोट्या उड्डाण मोहिमा सुरू आहेत.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र बचाव कार्यासाठी आवश्यक समन्वय, माहिती अद्ययावत करणे आणि संबंधित कुटुंबियांना मदत पुरविण्यासाठी सक्रिय आहे.
संपर्क क्रमांक :
1. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र 9321587143 022-22027990 022-22794229
2. डॉ. भालचंद्र चव्हाण, संचालक, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, महाराष्ट्र 9404695356 3. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड 0135-2710334 8218867005
4. प्रशांत आर्य, जिल्हाधिकारी, उत्तरकाशी 9412077500 8477953500
5. मेहेरबान सिंग (समन्वय अधिकारी) 9412925666
6. मुक्ता मिश्रा, सहाय्यक जिल्हाधिकारी, उत्तरकाशी 7579474740
7. जय पनवार, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, उत्तराखंड 9456326641
8. सचिन कुरवे (समन्वय अधिकारी) 8445632319
