पुणे / महान कार्य वृत्तसेवा
हरवलेली किंवा बेपत्ता झालेली माणसं शोधणे म्हणजे जणू गर्दीत सुई शोधण्यासारखं कठीण काम आहे. काहीजण वर्षानुवर्षे बेपत्ता असतात. त्यांचा कधीच शोध लागत नाही. हरवलेली व्यक्ती पुन्हा सापडेल का? ती सुखरूप असेल का? अशा असंख्य प्रश्नांनी त्यांच्या नातेवाईकांचं आयुष्य अस्वस्थ झालेलं असतं. अशा कठीण वेळी पुण्यातील शिवा पासलकर त्यांच्या मदतीला धावून येतात.
शिवा पासलकर हे महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे अध्यक्ष म्हणून गेल्या 15 वर्षांपासून नि:स्वार्थपणे काम करत आहेत. त्यांनी आजवर शेकडो बेपत्ता व्यक्तींना शोधून त्यांच्या कुटुंबियांपर्यंत सुरक्षित पोहोचवलं आहे. विशेष म्हणजे या कामासाठी ते कोणताही मोबदला घेत नाहीत.
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहणारे आणि व्यवसायाने प्लॉटिंग करणारे शिवा पासलकर यांनी समाजसेवेसाठी समाजमाध्यमांचा उपयोग करण्याचा निर्धार केला. फेसबुक, व्हॉट्सॲपवरील विविध ग्रुप, संघटना, मंडळं आणि सहकाऱ्यांमधील नेटवर्कचा उपयोग करून ते हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेतात. त्यांनी आतापर्यंत 750 हून अधिक बेपत्ता लोकांना शोधलं आहे. ”गणेश मंडळं, सामाजिक संघटना, स्थानिक कार्यकर्ते आणि पोलीस यांचं सहकार्य मिळालं की एखादी केस तासाभरात सोडवता येते,” असं पासलकर म्हणाले.
सुमारे 15 वर्षांपूर्वी शिवा पासलकर यांच्या मित्राची बहीण बेपत्ता झाली होती. अनेक दिवसांनंतर एका कालव्यात ती मृतावस्थेत आढळली. ओळख पटली नाही म्हणून पोलिसांनी तिला बेवारस मानून अंत्यसंस्कार केले. ही घटना पासलकर यांच्या मनात खोलवर रुजली. त्याच क्षणी त्यांनी बेपत्ता लोकांना शोधण्याचं कार्य सुरू करण्याचे ठरवले.
कोणतीही केस मिळाल्यानंतर शिवा पासलकर हे सर्वप्रथम संबंधित कुटुंबीयांना पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला देतात. त्यानंतर व्यक्तीचं वय आणि मानसिक स्थिती याबाबत माहिती घेतली जाते. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोस्टर तयार करून सोशल मीडियावर शेअर केलं जातं. कधी ते स्वत: पोलीस स्टेशन्समध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासतात. अशा प्रकारे त्यांनी अनेक हरवलेल्या व्यक्तींना शोधून काढलं आहे.
”हरवलेली व्यक्ती परत आल्यावर कुटुंबियांचा आनंद पाहून मला खूप समाधान वाटतं. यामुळेच मला अधिक काम करण्यास बळ मिळते,” असं शिवा पासलकर म्हणाले.
