12 कार सतत फिरत्या ठेवणार, नेमका काय प्रकार ?
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मुंबईत कबूतरखाना आणि कबुतरांना दाणे टाकण्यास बंदी करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेनं अनेक ठिकाणी कबूतरखाने बंद केले आहेत. दादरच्या कबूतरखान्याला मुंबई महापालिकेने ताडपत्रीने झाकले होते, त्यानंतर जैन समाजाने आंदोलन करत कबूतरखान्यावरील ताडपत्री काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता. आंदोलक कबूतर खान्यामध्ये घुसून त्यांनी ताडपत्री सोडवून कबूतरखाना सुरु करण्याचा प्रयत्न केला होता. यावर न्यायालयाने ताशेरेही ओढले.
त्यातच आज दादरमध्ये एक नवा व्हिडिओ पाहायला मिळाला. तो म्हणजे लालबागच्या एका जैन रहिवाशाने दादरमध्ये येऊन गाडीवर कबुतरांना खाद्य टाकल्याचे पाहायला मिळत आहे. चार चाकीच्या छतावर कबूतरांना एका ट्रेमध्ये दाणे टाकल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. एवढेच नाही तर आणखी 12 गाड्या येणार आहेत, अशी धमकी सुद्धा या चारचाकीच्या मालकाकडून देण्यात आल्याचे समोर आले आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
महेंद्र संकलेचा हे लालबागच्या चिवडा गल्लीतील मॅग्नम टावर येथे वास्तव्यास आहे, असे या व्हिडिओमध्ये ते म्हणत आहे. आज सकाळी संकलेचा यांनी दादर येथे येऊन चारचाकीच्या छतावर ट्रेमध्ये कबुतरांना दाणे टाकले होते. हे सगळं सुरू असताना एका स्थानिक रहिवाशाने या प्रकरणाबाबत विचारणा केली असता आणखी 12 गाड्या येणार आहे, असा सूर त्यांचा पाहायला मिळाला. जी काय ॲक्शन घ्यायची ती घ्या. माझ्या गाडीचा नंबर घेऊन आरटीओला तक्रार करा, असे ही या व्हिडिओ मध्ये बोलल्याचे पाहायला मिळत आहे. दादर येथील एका रहिवाशाने हा व्हिडिओ काढला आहे तर चारचाकी चालक महेंद्र संकलेचा हे जैन असल्याचे समजते आहे.
न्यायालयाच्या आदेशाचा धाक आहे की नाही?
दरम्यान, 3 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या अधिवेशनादरम्यान मंत्री उदय सामंत (शिवसेना नेते) यांनी कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका असल्याने मुंबईतील 51 कबुतरखाने तात्काळ बंद करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर, बीएमसीने शहरातील कबुतरखान्यांविरुद्ध मोहीम सुरू केली ज्या अंतर्गत कबुतरांना खायला घालणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला आणि कबुतरखान्याना बंद करण्यात आले. दादर पश्चिम येथील कबूतरखाना पालिकेने ताडपत्री लावून बंद केला. या नंतर जैन धर्मीय यांच्याकडून थेट कबुतरखाना खुला करावा म्हणून आंदोलन झाले आणि त्यांनी दादर येथील ताडपत्री काढून टाकण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण पुन्हा कोर्टात सुनावणीला गेले आणि न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणी 31 तारखेला होईल, असे म्हणत आंदोलनावर ताशेरे ओढले. कबूतरखाने बंदच राहतील, असे आदेश देखील न्यायालाने दिले. कोर्टाने दिलेले आदेश असताना ही, आता अनेक जणांकडून युक्त्या लावून कबुतरांना धान्य टाकण्याचे पराक्रम सुरूच आहेत. काही जण गच्चीवर कबूतरांना धान्य देत आहेत तर काही गाडीच्या छतावर. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा धाक आहे की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
आतापर्यंत इतका दंड
दिनांक 13 जुलै पासून ते 3 ऑगस्टपर्यंत पालिकेने आतापर्यंत 44 कबूतरखाने प्रकरणी 142 केसेस दाखल केल्या आहेत. या सगळ्यांकडून 68700 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सगळ्यात जास्त दंड हा दादर पश्चिम येथील कबुतरखान्याच्या ठिकाणावरून 22200 रुपये इतका दंड 51 जणांकडून वसूल करण्यात आला आहे.
पुढील सुनावणी ही 13 ऑगस्टला
कबूतरखाने सुरू ठेवायचे की बंद करायचे? यावरील पुढील सुनावणी ही 13 ऑगस्टला पार पडणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिर्केने कबूतरखाने झाकले, बंद केले गेले. पण जैन धर्मियांकडून भावना अनावर होत याविरोधात आंदोलन केले. तर काही जणांनी टेरेसवर गाडीच्या छतावर आता धान्य कबुतरांना टाकण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर दादर येथील कबूतरखान्याच्या येथे बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तर दादर बाहेरची लोक दादरमध्ये येऊन कबूतरांना खाद्य टाकल्याने संख्या वाढली, असा आरोप देखील होत आहे.
