अमरावती / महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी गेल्या महिन्यात काढलेल्या ‘सातबारा कोरा’ यात्रेला पाठिंबा जाहीर केला आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यवतमाळ जिल्ह्यात पदयात्रेत सहभागी झाले, तेव्हाच बच्चू कडू यांना नवा साथीदार मिळाल्याचे स्पष्ट झाले. पण, बच्चू कडू यांनी यांनी बुधवारी राज ठाकरेंची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी या नवीन समीकरणांवर शिक्कामोर्तब झाले. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. अनेक विरोधी पक्षातील नेते, शेतकरी नेते त्यांच्या पाठीशी उभे ठाकले आहेत. पण, आता राज ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्याशी थेट आगामी आंदोलनाची दिशा, धोरण आणि मागण्यांविषयी चर्चा केल्याने येत्या काळात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मनसेच्या कार्यक्रम पत्रिकेवर देखील ठळकपणे येईल, असे संकेत मिळाले आहेत.
