मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे. मात्र आता समाजात दरी निर्माण करण्याचे काम सुरु आहे. समाजात दोष निर्माण करण्याचे काम सुरु आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्याची वाटचाल सुरू आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा महाराष्ट्र आहे. पण आजच्या परिस्थितीत देशात भाजपच्या विरोधात लढा देणार काँग्रेस हाच पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसचे हात बळकट करणे आणि त्याच्या पाठी उभे राहणे महत्वाचे आहे.काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मी एक आश्वासन देतो की परभणीत काँग्रेस पक्ष 1 क्रमांकाचा पक्ष राहील. सगळ्या निवडणुकीत राष्ट्रवादी जिल्ह्यात पहिला होता, पण आता काँग्रेस पहिला पक्ष असेल, असा विश्वास बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच व्यक्त केला आहे.
दरम्यान, बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची साथ सोडत काँग्रेसची वाट धरली आहे. परभणीमध्ये सुरेश वरपूडकर काँग्रेस मधून भाजपमध्ये गेल्यानंतर आता माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालाय. आज (7 ऑगस्ट) बाबाजानी दुर्राणी यांनी मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यावेळी ते बोलत होते.
काँग्रेसकडून शरद पवारांना मोठा हादरा
देशपातळीवर काँग्रेस पक्ष हा भाजप विरोधात लढत असल्याने आपण काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे बाबाजानी यांनी सांगितले आहे. सर्व पदाधिकाऱ्यांसह आपण काँग्रेस प्रवेश केला असून येत्या काळात काँग्रेस वाढविण्यावर भर देणार असल्याचे बाबाजी यांनी स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीत ही त्यांनी पाथरी विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात ते पराभूत झाले होते. त्यानंतर बाबाजानी दुर्राणी हे मागच्या महिन्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. सर्व तयारी करण्यात आली होती, मात्र ऐन वेळी हा प्रवेश झाला नाही आणि आता बाबाजानी यांनी काँग्रेस प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.
काँग्रेस हाच देशात भाजपच्या विरोधात लढा देणार पक्ष- बाबाजानी दुर्राणी
देशात ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे त्याच पद्धतीने या राज्यात आजचे सरकार आहे. आपण देशाचे आणि राज्याचे चित्र पाहिले तर देशात अल्पसंख्याक समुदाय कुठे आहे हे दिसून येईल. पहिल्यापासून काँग्रेसच्या सरकारमध्ये सगळे सुरक्षित आहेत. अमित देशमुख म्हणाले बडी देर कर दी आते आते. पण आज विलासराव देशमुख यांची आठवण आली. ते नेहमी बोलायचे तुम्ही काँग्रेसमध्ये पाहिजे होते. तर आज जे राजकारण आपण पाहतोय. ते पाहता देशात भाजप आणि काँग्रेस दोनच पक्ष राहणार. बाकी कोणते पक्ष राहणार नाहीत. पुढे कोर्टाचा निर्णय काहीही लागेल त्याबद्दल माहीत नाही. पण आजच्या परिस्थितीत देशात भाजपच्या विरोधात लढा देणार काँग्रेस हाच पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसचे हात बळकट करणे आणि त्याच्या पाठी उभे राहणे महत्वाचे आहे. अशी प्रतिक्रिया परभणीतील शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिलीय.
