गडचिरोली / महान कार्य वृत्तसेवा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय गटबाजी पु्न्हा चव्हाट्यावर येत आहे. तर, पक्षांतर्गत गटबाजीमुळे पक्षबदलाचेही निर्णय घेत असल्याचं दिसून आलं. पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी किंवा मंत्री महोदयांच्या दौऱ्यात ही गटबाजी उफाळून समोर येत आहे. शिवसेना नेते आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावेळी शिवसेना शिंदे गटातील गटबाजी पाहायला मिळाली. येथील दोन जिल्हाप्रमुखांमधील वादाचे रुपांतर चक्क मारहाणीपर्यंत पोहोचले. यावेळी, स्थानिकांनी मध्यस्थी करत सोडवणूक केली.
राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आज गडचिरोली दौऱ्यावर होते. येथील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आटोपल्यानंतर ते चंद्रपूरला रवाना होताच शिंदे गटातील दोन जिल्हाप्रमुखांमध्ये श्रेय वादावरून तुफान राडा झाला आणि ते एकमेकांवर भिडल्याचा प्रकार गडचिरोलीच्या सर्किट हाऊसमध्ये बघायला मिळाला. शिवसेना गडचिरोली जिल्हाप्रमुख म्हणून संदीप ठाकूर तर अहेरी जिल्हाप्रमुख म्हणून राकेश बेलसरे सध्या कार्यरत आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सर्किट हाऊसमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होती. त्यामुळे जिल्हाभरातील बहुसंख्या शिवसेना पदाधिकारी येथे उपस्थित होते. मात्र, मंत्री भुसे चंद्रपूरकडे रवाना होताच दोन पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेय वादावरून हमरीतुमरी झाली, आणि एकमेकांवर भिडले. त्यामुळे शिंदे सेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी हा वाद झाल्याने पक्षाला याचा फटका बसू शकतो, असा राजकीय कयास लावला जात आहे.
ग्रामस्थांनी शिक्षणमंत्र्यांचा ताफा अडवला
गडचिरोली-नागपूर मार्गावरील काटली गावात आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास एका भरधाव ट्रकने व्यायाम करणाऱ्या सहा मुलांना चिरडले. त्यात दोघे जागीच ठार झाले तर दोघांचा गडचिरोलीच्या रुग्णालयात मृत्यू झाला. दोघांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आले असून या घटनेनंतर काटली गाववासियांनी तब्बल 5 तास नागपूर मार्गावरील वाहतूक रोखून धरली. दरम्यान, गडचिरोलीच्या दौऱ्यावर असलेले शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन गावकऱ्यांची समजूत काढली. त्यामुळे 5 तासानंतर येथील वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे, या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव भांड्याप पडला. मात्र, अपघातात चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
