Spread the love

नवी मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

वाहतूक कोंडीने हैराण नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. घणसोली, पामबीच, कोपरखैरणे परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असून प्रवास अधिक सुसह्य होणार आहे. ठाणे-बेलापूर मार्गाला वाशीकडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर महापेतून कोपरखैरणेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाची मार्गिका बनवण्यात येणार आहे. यासाठी निविदाही काढण्यात आली असून ठेकेदारांची पात्रता सिद्ध झाल्यास मार्गिका बनवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

नवी मुंबई महापालिका उड्डाणपुलाची मार्गिका बनवण्यासाठी 24 कोटी रुपये खर्च करणार आहे. या उड्डाणपुलाची लांबी 431 मीटर असणार आहे. तर हा उड्डाणपूल झाल्यानंतर कोपरखैरणे येथील भुयारी मार्गातून होणारी वाहतूक कोंडी संपुष्टात येणार आहे. नव्या उड्डाणपुलाची लांबी 431 मीटर तर रुंदी 7.50 मीटर असेल.

ठाणे ते बेलापूर मार्गाच्या समांतर ट्रान्स हार्बर मार्ग असून पूर्वेला एमआयडीसी तर पश्चिमेला सिडको वसाहत आहे. पूर्वेकडील ठाणे – बेलापूर मार्गावरून सिडकोकडे जाण्यासाठी उड्डाणपूल तसेच भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. पण कोपरखैरणे येथे जाण्यासाठी भुयारी मार्ग बांधलेला नाही. तसेच भुयारी मार्गातून बस आणि इतर अवजड वाहने जात नाहीत. एकच मार्गिका असल्याने वाहतूक कोंडीचे प्रमाण देखील जास्त आहे. त्यामुळे कोपरखैरणेकडे जाताना वाहनचालकांना कोपरीवरून किंवा घणसोलीतून 5-6 किमीचा फेरफटका मारून जावे लागते. दरम्यान, कोपरखैरणेतून महापे उड्डाणपुलाला मार्गिका जोडल्यास महापे, कोपरखैरणे आणि घणसोली येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. तसेच भविष्यात ऐरोली घणसोली उन्नत मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांनाही या मार्गिकेचा लाभ होईल.