मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेसचे वादग्रस्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाबाबत आज फैसला होण्याची शक्यता आहे. कॅबिनेट बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ॲण्टी चेंबरमध्ये माणिकराव कोकाटे यांची बैठक झाली. या बैठकी अजित पवारांनी कोकाटे यांचे कान टोचले असल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची मुंबई मंत्रालयात त्यांनी भेट घेतली. या बैठकीत काय चर्चा होते, अनब काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागले आहे. अशातच अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे.
माणिकराव कोकाटे हे याआधी देखील अडचणीत आले होते. कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने महायुतीची कोंडी झाली होती. कृषी खाते हे ओसाड गावची पाटिलकी असल्याचे म्हटले होते. त्याशिवाय, शेतकरी कर्जमाफीवर देखील वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याच्या परिणामी सरकारवर जोरदार टीका सुरू झाली. त्यातच काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे हे विधीमंडळाच्या सभागृहात कामकाज सुरू असताना रमी खेळत असल्याचे समोर आले. त्यावरूनही माणिकराव कोकाटे आणखीच अडचणीत सापडले.
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची मंत्रालयात आज भेट घेतली. यावेळी त्यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा नको, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, किती वेळा चुका करणार आणि किती वेळा माफ करायचं असा उलट सवाल शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी केला. आता राजीनामा नको म्हणून आपण आलात मात्र ज्यावेळी मी स्वत:हून मंत्रिपद दिलं त्यावेळी कुणीही आलं नव्हतं असेही अजित पवारांनी सुनावले. सतत चुका होतं असल्यामुळे आता माफी नाही अशी थेट भूमिका अजित पवारांनी घेतली.
अजित पवार यांनी म्हटले की, कोकाटे तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. त्यामुळे बोलताना आपण भान ठेवायला हवं अशा शब्दात अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला. अजित पवार यांच्या पवित्र्यामुळे आता कोकाटेंच्या मंत्रिपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांच्या संतापानंतर माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भविष्यात अशी चूक होणार नाही, अशी वक्तव्ये देखील करणार नाही, यापुढे आपण काळजी घेऊ असे कोकाटे यांनी सांगितले. त्यानंतर आता अजित पवार काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अजितदादा आणि माणिकराव कोकाटे यांच्यासोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीचेही मंत्री उपस्थित होते.
