Spread the love

अहिल्यानगर / महान कार्य वृत्तसेवा

अहिल्यानगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या शनि शिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नितीन शेटे यांनी सोमवारी सकाळी आठ वाजता त्यांच्या राहत्या घरात छताला दोर टांगून गळफास घेतला. या घटनेमुळे शनि शिंगणापूरमध्ये खळबळ उडाली आहे. नितीन शेटे हे सध्या शनिशिंगणापूर देवस्थानाचे उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यामुळे या परिसरात त्यांचा चेहरा अनेकांना परिचित होता. आज सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर शनि शिंगणापूरमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी त्यांचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे आहे. या घटनेमुळे शनि शिंगणापूर गावावर शोककळा पसरली आहे. नितीन शेटे हे आमदार शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक होते. नितीन शेटे यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरी त्याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून शनि शिंगणापूनर देवस्थानात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरु होती. या पार्श्वभूमीवर नितीन शेटे यांची आत्महत्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आता या अहवालातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, त्यांच्या आत्महत्येचा आणि भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीचा काही संबंध असावा का, याविषयी सध्या तर्क लढवले जात आहेत. पोलिसांनी अद्याप या घटनेबद्दल कोणतीही अधिकची माहिती दिलेली नाही. त्यामुळे आता पुढील चौकशीत काय समोर येणार, याकडे पोलिसांच्या नजरा लागल्या आहेत.