शहापूर / महान कार्य वृत्तसेवा
ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्याच्या किन्हवली पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका महिलेनं आईच्या नात्याला काळिमा फासत आपल्या तीन मुलींची निर्घृण हत्या केली आहे. आरोपी महिलेनं आपल्या 3 लहानग्या मुलींना दुपारच्या जेवणात किटकनाशक (विष) टाकून त्यांची हत्या केली आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र आरोपी महिलेच्या पतीने संशय व्यक्त केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
संध्या संदीप भेरे असं अटक केलेल्या 30 वर्षीय आरोपी आईचं नाव आहे. तर काव्या संदीप भेरे (10 वर्ष), दिव्या संदीप भेरे (8 वर्ष), गार्गी संदीप भेरे (5 वर्ष) असं मृत पावलेल्या मुलींची नावं आहेत. मुलींची आई संध्या संदीप भेरे हिने 20 जुलै रोजी दुपारच्या जेवणातील वरणात कीटकनाशकं विषारी औषध मिसळून तिन्ही मुलींना खायला देऊन त्यांना ठार मारलं आहे. जेवणातून विष दिल्यानंतर तिन्ही लहान मुलींची अचानक तब्येत बिघडली होती. यानंतर नातेवाईकांनी त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नांना अपयश आलं.
मोठी मुलगी काव्याचा 24 जुलैला सकाळी 10 वाजता मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तर दुसरी मुलगी दिव्याचा दुसऱ्या दिवशी 25 जुलैला 10 वाजता याच रुग्णालयात मृत्यू झाला. तर सर्वात लहान चिमुकली गार्गीचा एश्ँऊ घोटी येथील रुग्णालयात 24 जुलैला साडे दहा वाजता मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्याच्या चेरपोली गावामध्ये हे कुटुंब आपल्या 3 मुलींसोबत राहत होते. मुलींच्या आई – वडिलांचे दोन वर्षांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून आई तिच्या तीन ही लहान मुलींना घेऊन आपल्या माहेरी अस्नोली या गावी राहत होती. ती एका वेअरहाऊसमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होती.
ती जीवनात त्रस्त होती. तीन मुलींचा खर्चाचा भार सांभाळण्याचा तिला कंटाळा आला होता. त्यामुळे त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक दुपारच्या जेवणाच्या वरणात कीटकनाशक विषारी औषध मिसळून तीन मुलींना ठार मारल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी आईला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
