Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

राज्यातील अनेक मंत्री हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा गंभीर आरोप होत असतानाच आज पुण्यामध्ये रेव्ह पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रंगेहाथ पकडण्यात आल्यानं एकच राजकीय खळबळ उडाली आहे. आज पहाटे तीनच्या सुमारास भाड्याने ऑनलाईन घेतलेल्या आलिशान फ्लॅटमध्ये प्रांजल यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या ठिकाणावरून हुक्का तसेच गांजा व अन्य अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.

राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी तर केलं जात नाही ना?

दरम्यान, प्रांजल खेवलकर यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर विरोधकांनी सुद्धा जोरदार प्रहार केला आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे संपूर्ण प्रकरण हनीट्रॅपशी जोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी सुद्धा या प्रकरणाचा हनीट्रॅपशी प्रकरणाशी जोडत कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात पोलीस तपास आणि न्याय वैद्यकीय चाचणीत सत्य समोर येईलच, परंतु हनीट्रॅप प्रकरणात सरकारला अडचणीत आणणाऱ्या मा. खडसे साहेबांच्या कुटुंबाच्या बाबतीत राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी तर केलं जात नाही ना, हेही बघितलं पाहिजे. कुणी दोषी असेल तर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, परंतु हे राजकीय षडयंत्र असेल तर मात्र हे अत्यंत चुकीचं आणि राजकारणाचा स्तर खालच्या पातळीवर गेल्याचं लक्षण आहे.

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये वाद

दुसरीकडे कारवाईवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना खडसे यांना यांना अशा प्रकारच्या कारवाईची माहिती होती, तर खडसे यांचे जावई लहान मुल आहे का? अशी विचारणा करत पलटवार केला आहे. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गंभीर आरोपांची मालिका सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. कालच एकनाथ खडसे आणि पत्रकार परिषद घेत जेव्हा जेव्हा महिलांचा विषय येतो तेव्हा गिरीश महाजनाचे नाव कसे येतं असा बोचरा सवाल केला होता. गिरीश महाजन अर्ध्या खात्याचे मंत्री असल्याचे सुद्धा म्हटलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर अवघे काही त्रास होत असतानाच एकनाथ खडसे यांचे जावईच आता रेव्ह पार्टीमध्ये सापडल्याने पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडाला आहे.

”चुपब  बैठो नही तो रेड करुंगा…”  दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा हल्लाबोल केला आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरवर आज झालेली कारवाई म्हणजे स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत बोलणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. खडसे आणि खडसेंसारख्या बोलणाऱ्या अनेक लोकांच्यासाठी हा एक संदेश आहे, ”चुपब  बैठो नही तो रेड करुंगा…”