मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आणि इतर वंचित घटकांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन पुकारले असून अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यातून या आंदोलनाची सुरूवात झाली आहे.
बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वीच विदर्भात ”शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा” या मागणीसाठी पदयात्रा काढली होती. त्यादरम्यानच सरकारकडून मिळालेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आंदोलनाच्या तयारीची दिशा ठरवण्यात आली होती. आता हे आंदोलन रस्त्यावर उतरले असून, विविध ठिकाणी प्रहार कार्यकर्ते आणि शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी परतवाडा-अमरावती महामार्ग अडवून टायर जाळत चक्काजाम आंदोलन केलं. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असून, हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आज प्रहार संघटनेचं आंदोलन सुरू आहे. कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार आदी घटकांच्या मागण्यांचा समावेश आहे. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप करत, बच्चू कडूंनी सरकारवर थेट हल्ला चढवला आहे.
”आता हे आंदोलन सरकारच्या नियंत्रणात राहणार नाही. शेतकरी, मजूर, दिव्यांग यांची फसवणूक करणाऱ्या सरकारविरोधात आमची लढाई तीव्र होणार आहे,” असा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर त्यांनी विरोधकांनाही आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले असून, त्यामुळे पुढील काही दिवसांत आंदोलनाला व्यापक रूप मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
परतवाड्यात झालेल्या सभेत बच्चू कडू यांनी आक्रमक भाषेत सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी म्हटलं, ”आता तारीख न सांगता थेट मंत्रालयात घुसू. समित्यांचे अध्यक्षही म्हणतात की त्यांना काही माहित नाही. सरकारने लुटलं, तर कर्जमाफी द्यावीच लागेल. आम्ही गुन्हे दाखल होण्यास घाबरणार नाही. आता गांधीगिरी संपली, भगतसिंगगिरी सुरू झाली आहे.”
युवकांच्या आत्महत्या, वाढती बेरोजगारी आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव यावरही त्यांनी संताप व्यक्त केला. पुढील आंदोलन 29 जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या समाधीस्थळी होणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील गोंडखैरी येथे होणाऱ्या आंदोलनाआधीच पोलिसांनी प्रहार कार्यकर्त्यांवर कारवाई करत काहीजणांना ताब्यात घेतले आहे. रजनीकांत आतकरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना काल रात्री उशिरा अटक करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी थेट बच्चू कडूंशी फोनवर संपर्क साधत ही माहिती दिली. कडूंनीही पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली व तातडीने सोडण्याची मागणी केली.
