Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील रहिवासी आणि कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशनअंतर्गत गावांमध्ये पाणीपुरवठ्याचं काम पूर्ण केलं होतं. मात्र, शासनाकडून कामाचे पैसे न मिळाल्यामुळे आणि त्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या मानसिक त्रासामुळे त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर सरकारवर जोरदार टीका होत आहे. सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केला आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

रोहित पवार म्हणाले की, काल आपण ऐकलं की हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली. जलजीवन मिशन अंतर्गत ते काम करत होते. अनेक कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतले होते. 1.40 कोटी रुपये सरकारकडे त्यांचे स्थगित होते. हर्षल पाटील यांना 5 वर्षाची मुलगी आहे. त्यांचं मोठं कुटुंब आहे. अशा 35 वर्षाच्या युवकाने काम सरकारकडून घेतले. सुरुवातीला पैसे वेळेवर देण्यात आले. त्यानंतर अधिकारी पैसे नाहीत, असे सांगायचे. आज राज्यात 90 हजार कोटी रुपये थकीत आहेत. हे सगळे कॉन्ट्रॅक्टरचे पैसे आहेत. सरकार पैसे देत नाही. छोटे कॉन्ट्रॅक्टर यात दुर्दैवाने अडकले आहेत. आम्ही सरकारकडे सातत्याने मागणी करत आहोत की हे पैसे लवकर द्या.

सरकारने हर्षल पाटील यांचा खून केलाय

लाडकी बहीण योजना घाईगडबडीने आणली. निवडणूक जिंकणं हेच मनामध्ये होतं. अनेक कॉन्टॅक्टची दिशाभूल सरकारने केली. या राज्यात 1 लाख कॉन्ट्रॅक्टर आहेत. निवडणुकीच्या आधी केवळ कामे देण्यात आली. आता केवळ मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला कामे दिली जात आहेत. या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला न्याय दिला पाहिजे. हर्षल पाटील यांनी आत्महत्या नसून हा खून आहे. सरकारने हर्षल पाटील यांचा खून केला, असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. सरकारला विनंती आहे की, सगळे पैसे देऊन टाका नाहीतर सरकारवर गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

सरकार वेडं झालंय रोहित पवार पुढे म्हणाले की, हे डायरेक्ट काम हर्षल पाटील यांना दिलं नसेल. सब कॉन्ट्रॅक्टर ते होते, असे दिसत आहे. 16 हजार कोटी रुपये जलजीवन मिशनचे थकले आहेत. केंद्र सरकारकडून अतिरिक्त पैसे देण्यात येणार नाहीत हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. तीन मोठे एकत्रित बसतात. मोठे-मोठे प्रोजेक्ट मंजूर करतात. शक्ती मार्गाची काही गरज आहे का? मलिदा खायचं काम हे सरकार करत आहे. सरकार वेडं झालं आहे. मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात हे पैसे घातले जात आहेत, असा हल्लाबोल देखील रोहित पवार यांनी केला आहे.