Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

यंदाच्या गणेशोत्सवासाठी तुम्ही कोकणात जाताय? कार घेऊन जाण्याचा विचार करताय? पण, हीच कार तुम्हाला ट्रेननं घेऊन जाता येऊ शकते. विश्वास नाही ना बसत? त्यासाठी कोकण रेल्वेकडून ‘कार ऑन ट्रेन’ अशी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. म्हणजेच रो-रो सेवेचा वापर करत मालवाहू ट्रक्स ज्याप्रमाणे वाहून नेले जातात, त्याचप्रमाणे कार नेण्याची सुविधा कोकण रेल्वे उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे वेळ, पैशाची बचत होणार असल्याचं सांगितले जात आहे. या प्रवासात कोकणचे निसर्गसौदर्यं देखील अनुभवता येणार आहे.

कार ऑन ट्रेन ही कोकण रेल्वेची सुविधा कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी तसं म्हटलं तर आनंद आणि दिलासा देणारी बाब ठरणार आहे. कारण, कोकण रेल्वेच्या माध्यमातून आता आपापल्या चारचाकी गाड्या घेऊन थेट कोकणात जाता येऊ शकते. दरम्यान, एका कारसाठी 7 हजार 875 रूपये मोजावे लागणार आहेत. यासोबतच तिघांना एसी कोच अथवा एसएलआर डब्यातून प्रवास करता येईल. मुख्य बाब म्हणजे कागदपत्रांची पूर्तता असेल किंवा प्रवासाशी निगडीत बाबींची पूर्तता करण्यासाठी कारसोबत प्रवाशांना किमान तीन तास अगोदर संबंधित स्टेशन्सवर हजर राहावं लागेल.

कोकणातील तीन जिल्ह्यांचा विचार केल्यास रायगड जिल्ह्यात किमान 1 लाख 3 हजार 24 घरगुती गणपती, रत्नागिरी जिल्ह्यात 1 लाख 50 हजार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान 65 हजार घरगुती गणपती विराजमान होतात. यावेळी कोकणात येणाऱ्या भाविकांची संख्या ही 25 ते 30 लाखाच्या घरात असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कोकणात येण्यासाठी दरवर्षी मोठी कसरत चाकरमान्यांना करावी लागते. त्यात मागच्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि दुरावस्था झालेला मुंबई – गोवा हायवे चाकरमान्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहाणारा असाच आहे. परिणामी कार ऑन ट्रेन सारखी सुविधा मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी फायदेशीर ठरेल असं सांगितलं जाते. ट्रेन, खासगी बस, एसटी, रेल्वे यांच्या आरक्षणाची स्थिती पाहता या सुविधेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कोकणवासियांची गणेशोत्सवासाठी कोकणात उसळणारी गर्दी पाहता यावर्षीपासून बोटीचा पर्यायही देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्रामार्गे पोहोचण्यासाठी किमान 4 ते 6 तासांचा वेळ लागेल. परिणामी, ट्रेन, खासगी बस, एसटी यांच्यासह कार ऑन ट्रेन या सुविधेची एक नवा पर्यायदेखील चाकरमान्यांना उपलब्ध झाला आहे. कोकण रेल्वे मार्गावर दररोज किंवा नियमितपणे धावणाऱ्या किमान 35 ते 40 फेऱ्या सध्या सुरु आहेत. त्यात गणेशोत्सवात जादा गाड्यांची संख्या पाहता फेऱ्यांची हीच संख्या अगदी 300 ते 320 च्या घरात जाते. त्यात आता कार ऑन ट्रेनसारखी सुविधा सुरू केली जाणार आहे. अर्थात ही सुविधा चाकरमान्यांच्या पसंतीला किती उतरते? हेदेखील पाहावे लागेल.