Spread the love

नाशिक / महान कार्य वृत्तसेवा

नाशिक शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका 20 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे. तिने पोलीस खात्यात काम करणाऱ्या आपल्या आईला उद्देशून भावनिक चिठ्ठी लिहून टोकाचं पाऊल उचललं आहे. एका पोलिसाच्या मुलीनं अशाप्रकारे आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

पूजा दीप डांबरे असं आत्महत्या करणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव आहे. अलीकडेच तिने बारावीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण केली होती. बारावीत पास झाल्यानंतर तिने प्रथम वर्षासाठी महाविद्यालयात ॲडमिशन देखील घेतलं होतं. ती रेग्युलर कॉलेजला देखील जात होती. मात्र अचानक तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिक्षणाचा खर्च अधिक असल्याने पुजाने आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत पूजाचे वडील तिच्या आईपासून विभक्त झाले आहेत. ती आपल्या आईसह नाशिकमधील बिडी कामगारनगर अमृतधाम इथं राहत होती. आई माझ्या शिक्षणाचा तुला त्रास नको. माझ्यामुळे तुझी धावपळ होते. तू टेन्शन नको घेऊ अशी चिठ्ठी लिहून 20 वर्षीय पुजाने आत्महत्या केली आहे. पुजाची आई पोलीस खात्यात महिला पोलीस अंमलदार पदावर कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी घरात कुणी नसताना पुजाने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय. आई तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक खर्च फार आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. तुझी धावपळ होते असं तरुणीने चिठ्ठीत लिहिलं आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आईला शिक्षणाचा खर्च जमवताना त्रास होतो, यामुळे तरुणीने आत्महत्या केल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.