Spread the love

21 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला / महान कार्य वृत्तसेवा

अकोल्यात मुदतबाह्य कीटकनाशके बॉटल फोडून नव्या बॉटलमध्ये टाकत असतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अकोल्यातल्या एमआयडीसी भागात व्हि.जे क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कीटकनाशके उत्पादन स्थळावर ही कारवाई करण्यात आली आहे. अकोला जिल्हा कृषी विकास अधिकारी तुषार जाधव यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केलीय. या ठिकाणी उपस्थित कर्मचारी व मजूरवर्गाकडून मुदत बाह्य कीटकनाशके बॉटल फोडून त्यामधील कीटकनाशके नवीन बॉटलमध्ये टाकणे, त्याचे वजन करणे व त्यावर नवीन बॅच क्रमांक व उत्पादन दिनांक नवीन स्टीकर लावणे, अशाप्रकारचं कामकाज सुरू होतं. आधीच अडचणीच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्याची अशा पद्धतीने होणारी फसवणूक हि गंभीर बाब असून यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होते आहे.

21 लाख 95 हजार रुपयांचा मुदतबाह्य कीटकनाशके साठा जप्त

पुढे आलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात कीटकनाशके कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून मुदतबाह्य ज्याची किंमत 21 लाख 95 हजार रुपयांचा साठा कृषी विभागाने जप्त केलाय. या उत्पादनस्थळावरून 8 कीटकनाशकेचे नमुने घेण्यात आली असून प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे. तर या तपासणीचा अहवालानुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सध्या सुरू आहे. मात्र ऐन शेतातील मशागतीची महत्वाच्या काळात असा प्रकार उघडकीस आल्याने शेतकरी वर्गासह प्रशासनातं खळबळ उडाली आहे.