मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपाप्रणित महायुतीला धोबीपछाड दिला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. या सहा महिन्यात महाविकास आघाडीचं नेमकं काय चुकलं? याचं विश्लेषण शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ या त्यांच्या पक्षाच्या मुखपत्राचे संपादक तथा खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत विधानसभेच्या पराभवाबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, ”प्रत्येक बाबतीत हात वर करून चालणार नाही. आपण काही जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाला, मतदार याद्यांचा घोटाळा झाला, बोगस मतदार आले, काही मतदारसंघात अखेरच्या क्षणी मतदार वाढले, यावर चर्चा चालू आहे. काही गोष्टी लोकांसमोर आल्या आहेत. त्याचबरोबर सरकारने काही योजना जाहीर केल्या होत्या, जसे की ‘लाडकी बहीण’सारखी योजना होती. यामध्ये पुढे सरकारची फसगत झाली ती गोष्ट वेगळी. मात्र, या सगळ्यामुळे त्यांना निवडणुकीत यश मिळालं.”
जागावाटप करताना चुका केल्या : उद्धव ठाकरे
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख म्हणाले, ”लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत आपण तीन प्रमुख पक्ष एकत्र आलो होतो. जागावाटपावरून आपल्यात खेचाखेच झाली, तशीच खेचाखेच महायुतीतही झाली. महाविकास आघाडी म्हणून लोकसभा निवडणूक आपल्याला जिंकायचीच आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चार-चार, पाच-पाच वेळा जिंकलेले मतदार संघ आपण आपल्या मित्रपक्षांसाठी सोडले. तसेच आपल्या मित्रपक्षांनी देखील सोडले. परंतु विधानसभेला सगळ्यांच्याच बाबतीत तसं घडलं नाही. शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटपावरून खेचाखेच चालू राहिली. मला-तुला, तू तू – मैं मैं असं शेवटच्या क्षणापर्यंत चालू होतं. त्याचा दुष्परिणाम असा झाला की जनतेत एक वाईट संदेश गेला. यांच्यात (मविआ) आत्ताच इतकी खेचाखेच चालू असेल तर नंतर काय होईल असा प्रश्न लोकांना पडला.
उद्धव ठाकरेंना मविआच्या भविष्याची चिंता?
उद्धव ठाकरे म्हणाले, ”विधानसभा निवडणुकीवेळी जे घडलं तीच चूक आपल्याला परत करायची असेल तर अशा एकत्र येण्याला काहीच अर्थ नाही. या सगळ्याला समन्वयाचा अभाव असं म्हणण्यापेक्षा लोकसभेवेळी मिळालेले यश काही लोकांच्या डोक्यात गेलं होतं ही गोष्ट मान्य करावी लागेल. मविआत लोकसभा निवडणुकीवेळी आपलेपणा होता, विधानसभेला मात्र मीपणा समोर आला आणि आपला पराभव झाला.”
