मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
इंग्लंडमधून एक धक्कादायक बातमी आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने अचानक भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. तो आता यॉर्कशायरकडून काउंटी क्रिकेटमध्ये खेळणार नाही. काउंटी क्लबने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.
ऋतुराज गायकवाडने यॉर्कशायरकडून काउंटी चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय कप खेळण्याचा करार केला होता, परंतु आता वैयक्तिक कारणांमुळे तो काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकणार नाही. त्याने स्पर्धेतून आपले नाव मागे घेतल्याचे समोर आले आहे.
ऋतुराज गायकवाड इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन अनधिकृत कसोटी सामन्यांसाठी इंडिया-अ संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. परंतु, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने तिथे यॉर्कशायरशी करार केला. त्याला काउंटी चॅम्पियनशिप आणि वन डे कप दोन्ही स्पर्धांमध्ये खेळावे लागले. गायकवाड आणि यॉर्कशायर यांच्यात पाच सामन्यांचा करार होता. ऋतुराज गायकवाड दि. 22 जुलैपासून काउंटी क्रिकेट खेळणार होता. तथापि, त्याने आता अचानक भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, ऋतुराज गायकवाड मागील दोन महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएल 2025 च्या दरम्यान त्याला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धा अर्धवट सोडावी लागली होती. त्यामुळे तो फक्त पाच सामन्यांपुरताच मर्यादित राहिला होता. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असलेल्या गायकवाडने या पाच सामन्यांत 24.40 च्या सरासरीने एकूण 122 धावा केल्या होत्या.
ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत एम.एस. धोनीने संघाची धुरा पुन्हा सांभाळली होती. मात्र, संघाचे प्रदर्शन अत्यंत निराशाजनक ठरल्याचे पाहायला मिळाले होते. यंदा चेन्नई सुपर किंग्ज पॉइंट्स टेबलवर शेवटच्या स्थानावर राहिली होती. ऋतुराज गायकवाड आणि चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझी यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले असून, फ्रँचायझी त्याला कर्णधारपदावरून हटवण्याचा विचार करत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
