मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
विधिमंडळाच्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला होता. 2017 साली शिवसेनेला महापौर पद मिळालं ते फडणवीसांना केलेल्या विनंतीमुळे मिळाले. एकीकडे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना शिव्या द्यायच्या. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ द्यायचा. केमिकल लोचा झाला बहुधा, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला होता. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची गरज आम्हाला वाटत नाही. फार किरकोळ माणूस आहे तो सध्याच्या राजकारणाचा. जो माणूस अमित शाह यांच्या मेहरबानीवर इथे गांडूळासारखा जगतोय, त्यांनी निर्माण केलेले प्रश्न किंवा त्यांच्या वळवळण्याला फार महत्व आम्ही देत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपचाच बाप मुंबई तोडणार
देवेंद्र फडणवीस विधानसभेतील भाषणात म्हणाले की, आता महापालिका निवडणुका आलेल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईला महाराष्ट्रापासून तोडले जाईल, अशा पद्धतीची भावनिक साद घातली जाईल. पण कोणाचाही बाप असो किंवा कुणाचाही आजा असो मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही, असे त्यांनी म्हटले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, भाजपचाच बाप मुंबई तोडणार आहे. ही नाटकी भाषा करू नका. महाराष्ट्र आणि मराठी हे नाट्यपंढरी आहे. इकडे खूप नटसम्राट निर्माण झाले आहेत. मुंबई तोडण्याचं कारस्थान हे पहिल्यापासून व्यापाऱ्यांचे आहे आणि ते व्यापारी भारतीय जनता पक्षाचे आहेत. तुम्हाला मुंबईतून फक्त थैल्या हव्या आहेत. तुम्हाला पैसे हवे आहेत. तुम्हाला मुंबई कंगाल करायची आहे आणि सरकार त्या लुटमारीला समर्थन देत आहे, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
राज ठाकरेंचे आव्हान दुबेला नव्हे तर भाजपला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना आव्हान दिले. दुबे…तुम मुंबई में आ जावो…मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे, असे त्यांनी म्हटले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांचे आव्हान एका दुबेला नाही तर भारतीय जनता पक्षाला आहे. दुबे हा भाजपचा पुढारी आहे. दुबे हा भाजपचा खासदार आहे. या दुबेचा तीव्र शब्दात निषेध भाजपच्या कोणत्याही नेत्याने व्यक्त केला नाही. शेंबूड पुसल्यासारखं नाराजी वगैरे कसली व्यक्त करत आहात? एक माणूस तिकडे बसून मराठी माणसाला आव्हान देतोय. महाराष्ट्राला आव्हान देतोय. मराठी माणसाला पटकून पटकून मारण्याची भाषा करतोय आणि हे राज्यकर्ते भाजपचे आणि मिंधे गटाचे लाचार, हे मान खाली घालून बसले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी जे आव्हान दिले आहे ते फक्त निशिकांत दुबेला नसून ते आव्हान त्यांनी महाराष्ट्र मुंबईकडे वक्र दृष्टीने पाहणाऱ्या भाजपला दिले आहे, असे त्यांनी म्हटले.
