Spread the love

लॉर्ड्स / महान कार्य वृत्तसेवा

लॉर्ड्स येथे भारताविरुद्ध झालेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी सामना इंग्लंडने जिंकला असला तरी त्यांना एक मोठा फटका बसला आहे. इंग्लंडने कमी ओव्हर रेट राखल्याचा ठपका ठेवत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कठोर कारवाई केली. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघाला त्यांच्या सामन्याच्या फीच्या 10 टक्के दंड आणि दोन आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्सचा दंड ठोठावण्यात आला. दुसरीकडे, भारतीय संघ कोणत्याही शिक्षेशिवाय सुटला आहे.  इंग्लंडने पाचव्या दिवशी अगदी रोमहर्षक सामन्यात 22 धावांनी हा सामना जिंकला, मात्र पाच दिवसांच्या संपूर्ण कसोटीचा विचार केला तर दिवसाच्या हिशोबाने अनेक षटके वाया गेली.

हा नेमका हिशोब काय?

वेळेचा हिशोब करूनही इंग्लंडने आवश्यक कोट्यापेक्षा दोन षटके कमी टाकल्याचे आढळल्यानंतर एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफ्रीजमधील रिची रिचर्डसन यांनी इंग्लंडचा संघ शिक्षेस पात्र असल्याचं जाहीर केलं. आयसीसीच्या नियमांनुसार, वेळेत न टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी संघांना त्यांच्या सामन्याच्या फीच्या पाच टक्के दंड ठोठावला जातो आणि प्रत्येक षटक कमी टाकल्याबद्दल एक डब्ल्यूटीसी पॉइंट कमी होतो. याच हिशोबानुसार, या प्रकरणात, इंग्लंडच्या खेळाडूंना त्यांच्या सामन्याच्या फीच्या 10 ज्ञब नुकसान होईल आणि संघाला दोन मौल्यवान डब्ल्यूटीसी पॉइंट्स ते गमावतील.

बेन स्टोक्सने गुन्हा कबूल केला आणि आयसीसीच्या शिक्षा स्वीकारली

अष्टपैलू कामगिरीसह संघाचं नेतृत्व करणारा कर्णधार बेन स्टोक्स याने कोणताही प्रतीदावा न करता दंड स्वीकारला. ”स्टोक्सने गुन्हा कबूल केला आणि प्रस्तावित शिक्षेचा स्वीकार केला, त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता नव्हती,” असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे.

मैदानावरील पंच पॉल रीफेल आणि शरफुद्दौला इब्ने शाहिद यांनी स्लो ओव्हर रेटचा ठपका ठेवला होता. अहसान रझा (टीव्ही पंच) आणि ग्रॅहम लॉयड (चौथे पंच) यांनीही सामन्यात पंच म्हणून काम पाहिले.

पॉइण्ट्स टेबलमध्ये भारत कितव्या स्थानी?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉइण्ट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया सर्व सामने जिंकून 100 टक्के विजयांसहीत पहिल्या स्थानी आहे. श्रीलंका दुसऱ्या, इंग्लंड तिसऱ्या तर भारत 33.33 टक्के विजयासहीत चौथ्या स्थानी आहे. भारताच्या खालोखाल बांगलादेशचा संघ आहे. याचबरोबर वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेने अजून एकही सामना खेळलेला नाही.

बेन स्ट्रोक्सनेच टाकली सर्वाधिक षटकं

सामनावीर म्हणून निवड झालेल्या स्टोक्सने भारताच्या दुसऱ्या डावात  24 षटके टाकली. इंग्लंडच्या कोणत्याही खेळाडूने टाकलेल्या षटकांपेक्षा ही षटकांची संख्या जास्त होती. त्याने अंतिम दिवसाच्या महत्त्वाच्या स्पेलमध्ये केएल राहुलच्या विकेटसह तीन महत्त्वाच्या विकेट घेतल्या आणि कमी धावसंख्येच्या सामन्यात फलंदाजीनेही योगदान दिले. चौथी कसोटी 23 जुलै रोजी मँचेस्टरमध्ये सुरू होत आहे. सध्या या मालिकेमध्ये इंग्लंडचा संघ 2-1 ने आघाडीवर असून अजून दोन कसोटी सामने शिल्लक आहेत.