लॉर्डस / महान कार्य वृत्तसेवा
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाला 22 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी 193 धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण डाव 170 धावांवर आटोपला. भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहोचला होता, पण सिराजची विकेट पडल्यामुळे भारताचा डाव संपुष्टात आला. त्यामुळे भारतीय संघ 2-1 ने पिछाडीवर आहे. या पराभवानंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील गुणतालिकेत चौथ्या स्थानी घसरला आहे.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी होती. पण फलंदाजांच्या फ्लॉप शो मुळे भारताचा पराभव झाला. 22 धावांनी विजय मिळवणारा भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. यापैकी 2 सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. भारतीय संघाची विजयाची सरासरी ही 33.33 टक्के इतकी आहे. एक सामना जिंकून भारतीय संघाने 12 गुणांची कमाई केली आहे.
इंग्लंडचा संघ कितव्या स्थानी?
इंग्लंडने देखील या हंगामात 3 सामने खेळले आहेत. यापैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडची विजयाची सरासरी ही 66.67 इतकी आहे. तर इंग्लंडने आतापर्यंत 24 गुणांची कमाई केली आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची सरासरी ही 100 टक्के इतकी आहे. तर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 24 गुणांची कमाई केली आहे. या यादीत श्रीलंकेचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. तर बांगलादेशचा संघ पाचव्या आणि वेस्टइंडिजचा संघ सहाव्या स्थानी आहे.
भारतीय संघासमोर सामना जिंकण्यासाठी 193 धावांचं आव्हान होतं. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. यशस्वी जैस्वाल, करूण नायर, शुबमन गिल आणि नाईट वॉचमन म्हणून आलेला आकाशदीप स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर पाचव्या दिवशी जोफ्रा आर्चरच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी नांग्या टाकल्या. सर्वात आधी ऋषभ पंत 9 धावांवर त्रिफळाचित होऊन माघारी परतला. त्यानंतर केएल राहुलही 39 धावांवर माघारी परतला. वॉशिंग्टन सुंदरला खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर जडेजाने नितीश कुमार रेड्डीसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. शेवटी जडेजाने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसोबत मिळून डाव सांभाळला. शेवटी सिराजची विकेट पडल्यामुळे भारताचा संघ विजयापासून 22 धावा दूर राहिला.
