मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
विविध मुद्द्यांवर अगदी स्पष्ट आणि परखडपणे आपली मतं मांडणाऱ्या कलाकारांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे अभिनेता सुमीत राघवन. मुद्दा मराठीचा असो किंवा राजकीय घडामोडींचा, त्यावर आपलं व्यक्तिगत मत कोणाच्याही प्रभावाखाली न येता मांडण्याच्या स्वभावामुळं हा अभिनेता अनेकांच्याच आवडीचा.
थोडक्यात अभिनयामुळं लोकप्रिय असण्यासमवेत एक सुजाण आणि सजग नागरिक अशीही सुमीत राघवनची ओळख. आपलं सेलिब्रिटीपण बाजुला ठेवून अनेकदा सामान्यांमध्येच आपली गणती करत कैक प्रश्नांवर तो कायमच मतं मांडत असतो. यावेळी सुमीत राघवन यानं मतं तर मांडलीच, मात्र राज्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर तीव्र शब्दांत संतापही व्यक्त केला.
सुमीत राघवननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्टेटसमध्ये एक रील शेअर करत (घ्हूेर ठाा) त्या माध्यमातून यंत्रणेवर आणि स्थानिक नेत्यांवर टीकेची झोड उठवली. पावसाळी दिवसांमध्ये रस्त्यावर पडलेले खड्डे, त्यात साचलेलं पाणी, प्रवाशांना होणारी गैरसोय आणि त्यातून उद्भवणारा धोका हे सारंकाही मांडण्यासाठी सुमीतनं काहीसा संतप्त सूर आळवला.
‘कामचुकारपणाचा आणि निर्लज्जपणाचा कळस आहे या राज्यात. सामान्य माणूस कसा जगतोय याच्याशी घंटा काही देणं घेणं नाहीये या लोकप्रतिनिधींना. मी गेली 5 वर्ष रोज जातो मीरा रोडला आणि हे दर वर्षीचं रडगाणं आहे.’ असं त्यानं इन्स्टा स्टेटसमध्ये म्हटलं आणि प्रशासनाला धारेवर धरलं.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
मुळच्या ‘मीराभाईंदरकर’ नावाच्या इन्स्टा अकाऊंटवरील व्हिडीओ सुमीतनं शेअर केला. या व्हिडीओमध्ये काही माणसं रस्त्यावरील खड्ड्यामध्ये सिमेंट ब्लॉक टाकून तात्पुरत्या स्वरुपात उपाय योजताना दिसत आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘जेव्हा प्रशासन आणि आमदार दुर्लक्ष करतात, तेव्हा सामान्य नागरिकांना पुढे यावं लागतं. हुद्द्यावर असणारी माणसं वस्तूस्थिती नाकारत असतानाच तिथं असणाऱ्या शोरुममधल कर्मचारी सामान्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. त्यांनी कोणाची वाट पाहिली नाही, तर पुढाकार घेत खड्डे बुझवण्याचा प्रयत्न केला. फक्त ये-जा करणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी…’. मीरा भाईंदरच्या रस्त्यांची दूरवस्था आणि त्यासंदर्भातील तक्रार गेल्या काही काळापासून सामान्य नागरिकांनी केली आहे. किंबहुना पश्चिम द्रृतगती मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे बुझवण्याच्या नावावरही डांबरीकरण करून ओबडधोबड रस्त्याचे अनेक टप्पे प्रत्यक्षात पाहायला मिळत असल्यानं सामान्य नागरिकांचा संताप आता अनावर होताना दिसत आहे. ज्यामुळं सुमीत राघवनची यासंदर्भातील पोस्टही चर्चेचा विषय ठरत आहे.
