Spread the love

यवतमाळ / महान कार्य वृत्तसेवा

यवतमाळ जिल्ह्याच्या लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघापूर परिसरात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं घरातील गॅल सिलेंडर पत्नीच्या डोक्यात घालून तिचा जीव घेतला आहे. ही हत्या इतकी भयंकर होती की घरात सगळीकडे रक्ताचा सडा पडल्याचं आढळलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीविरोधात खूनासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

इंद्रकला विजय जयस्वाल असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर विजय जयस्वाल असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. आरोपी विजय आणि पत्नी इंद्रकला यांचे मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते. आरोपी विजय सातत्याने इंद्रकला यांच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता. यातून दोघांमध्ये अनेकदा वादाची ठिणगी पडायची. यातून विजयने काहीवेला इंद्रकला यांना मारहाण देखील केली होती.

घटनेच्या दिवशी बुधवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा एकदा याच कारणातून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या विजयने पत्नी इंद्रकलाच्या डोक्यात स्वयंपाक घरातील सिलेंडर घातला. हा हल्ला इतका भयंकर होता, की एका फटक्यात इंद्रकला जमीनीवर कोसळल्या. पुढच्याच क्षणात घरभर रक्ताचा सडा पडला. वजनदार गॅस सिलेंडर डोक्यात घातल्याने इंद्रकला यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. या हल्ल्‌‍यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येची ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तसेच आरोपी पतीविरोधात खूनासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. लोहारा पोलीस पुढील तपास करत आहेत.