Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

आज संपूर्ण देशभर गुरू पोर्णिमा साजरी केली जात आहे. गुरू आणि शिष्याच्या पवित्र नात्याचा आदर करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पण दोन विद्यार्थ्यांनी ऐन गुरू पोर्णिमेच्या दिवशी गुरु-शिष्याला कलंकित करणारं कांड केलं आहे. त्यांनी आपल्या मुख्याध्यापकाची हत्या केली आहे. आरोपी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातच मुख्याध्यापकावर चाकुने हल्ला केला. हा हल्ला इतका भयंकर होता की मुख्याध्यापक रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जगबीर सिंह असं हत्या झालेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे. ते हरियाणातील हिसार जिल्ह्यातील बन्स बादशाहपूर गावात असलेल्या कर्तार मेमोरियल सीनियर सेकंडरी स्कूलचे मुख्याध्यापक होते. आज गुरु पोर्णिमेच्या दिवशीच शाळेत एक खळबळजनक घटना समोर आली. ज्यामुळे गुरु-शिष्य नात्याला कलंक लागला आहे. शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी त्यांचे मुख्याध्यापक जगबीर सिंग यांच्यावर चाकूने हल्ला केला. जखमी अवस्थेत, शाळेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ हिसारमधील एका खाजगी रुग्णालयात नेले, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शाळेच्या आवारात घडली. ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. असं सांगितले जात आहे की, विद्यार्थ्यांनी अचानक मुख्याध्यापकांवर चाकूने हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला. दुसरीकडे, घटनेनंतर दोन्ही विद्यार्थी फरार झाले आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे. ते 11वी आणि 12वीचे विद्यार्थी आहेत, जे अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही हल्लेखोर एकाच शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यांचा कोणत्या तरी कारणावरून मुख्याध्यापकांवर राग होता. याच रागातून त्यांनी हे हत्याकांड घडवलं आहे. पोलीस दोन्ही विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत आणि संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर शाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये आणि गावात तीव्र दु:ख आणि संताप आहे.