Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

सध्या राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधान परिषदेच्या बुधवारी झालेल्या कामकाजात एक वेगळीच राजकीय चतुराई पाहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका स्मार्ट खेळीची चांगलीच चर्चा रंगली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खेळीने शिवसेना ठाकरे गटातील दोन आमदारांमधील मतभेद उघड झाले असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे हे दोन्ही आमदार पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असल्याचे सांगण्यात येते.

मुंबईकरांवरील स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर लागू करण्याच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी आमदार मिलिंद नार्वेकर यांनी नवव्या क्रमांकावर लक्षवेधी सूचना दिली होती, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विशेषाधिकारांचा वापर करत ती थेट पहिल्या क्रमांकावर आणली. यामुळे नार्वेकर यांना सरकारकडून मिळालेलं ‘झुकतं माप’ लक्षात येताच, त्याच पक्षातील वरिष्ठ आमदार अनिल परब यांची अस्वस्थता उघडपणे दिसून आल्याची चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे, स्मार्ट मीटर या मुद्द्‌‍यावर नार्वेकर चर्चा करत असतानाच, त्यांनी स्मार्ट मीटरला विरोध नसल्याचे सांगितले. तर, दुसरीकडे अनिल परब यांनी सभागृहात दोन वेळा मध्येच उठून ‘माझा याला स्पष्ट विरोध आहे’ असं जाहीरपणे सांगितलं.

एकाच पक्षाची विरोधी मते?

एकाच पक्षाच्या दोन आमदारांची भिन्न विरोधी भूमिका समोर आल्याने सभागृहात एकप्रकारचा गोंधळ निर्माण झाला. मात्र, मिलिंद नार्वेकर यांनी संयम राखत आपली लक्षवेधी पूर्ण मांडली, आणि त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले.

मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर देताना नार्वेकर यांचे मुद्दे मान्य करत, अनिल परब यांचा अप्रत्यक्ष विरोध निष्प्रभ ठरवला. त्यामुळे एका मुद्द्‌‍यावरून ठाकरे गटाच्या अंतर्गत मतभेदांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्मार्ट वापर करत ‘राजकीय हिट विकेट’ घडवली, अशी चर्चा आता विधिमंडळाच्या वतुर्ळात रंगू लागली आहे. या घडामोडींमुळे, शिवसेना (ठाकरे गट) आंतर्गत याच मुद्द्‌‍यावरून मतभेद आहेत का, आणि पक्षीय एकवाक्यतेचा अभाव आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.