Spread the love

जाणून घ्या कोण आहे सागर धस?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या कारने दुचाकीला धडक दिल्याने नितीन शेळके यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी (दि. 07) रात्री 10.30 ते 11 वाजताच्या सुमारास हा अपघात सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामरगाव परिसरात घडला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सागर धस हा आष्टीहून पुण्याच्या दिशेने जात असताना, त्यांच्या कारने नितीन शेळके यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत शेळके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचेही संपूर्ण नुकसान झाले आहे.

आमदार पुत्राच्या भरधाव कारमुळे अपघात झाल्याची बातमी आष्टीसह संपूर्ण बीड जिल्ह्यात वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्यामुळे सागर धस आणि आमदार सुरेश धस यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. हे प्रकरण ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’चं असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून पोलीस प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात नेमका कोण आहे सागर धस?

कोण आहे सागर धस?

सागर धस हा आष्टी मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्याने वडिलांच्या प्रचारासाठी सक्रिय भूमिका बजावत राजकारणात पहिलं पाऊल टाकलं. सागर धसचे शिक्षण पुण्यात झाले असून, तो आष्टी मतदारसंघात युवा नेता म्हणून ओळखला जातो. आमदार सुरेश धस यांच्या अनुपस्थितीत मतदारसंघातील विविध सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये सागर धस याची उपस्थिती आणि सक्रिय सहभाग अनेक वेळा पाहायला मिळाला आहे.

सुरेश धसांची प्रतिक्रिया

दरम्यान, अपघातानंतर आमदार सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अहिल्यानगरमधील ही घटना घडली आहे. माझा मुलगा मुंबईला एका ट्रिटमेंटसाठी जात होता. त्यावेळी नितीन शेळके याची बाईक अचानक त्याच्या गाडीसमोर आली. त्यामुळे हा अपघात झाला. त्यानंतर माझ्या मुलाने आणि त्याच्या चुलत भावाने त्याला दवाखान्यात न्यायचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. हा अपघात झाल्यानंतर सागरने मला फोन केला होता. त्यानंतर मी स्वत: माझ्या मुलाला सांगितलं की तू तिथेच सांग, रितसर काही कारवाई असेल ती झाली पाहिजे. त्यानंतर पोलिसांनी माझ्या मुलाचे आणि ड्रायव्हरचे ब्लड सँपल घेतलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि मुलाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याचा तपास सुरू आहे, असे त्यांनी म्हटले. तर माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही. त्यामुळे ड्रिंक आणि ड्राईव्ह प्रकरणाचा प्रश्नच येत नाही असा दावा देखील आमदार सुरेश धसांनी केला आहे.