मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मराठी भाषेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भिडणाऱ्या सुशील केडिया यांचं ऑफिस मनसे कार्यकर्त्यांना 5 जुलैला फोडलं होतं. सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत थेट राज ठाकरे यांनाच आव्हान दिलं होतं. सुशील केडिया यांनी ट्वीट करत मराठी न शिकण्याची प्रतिज्ञाच केली होती. शिवाय काय करायचं आहे ते कर, असा एकेरी उल्लेख करत थेट राज ठाकरे यांनाच आव्हान दिलं होतं. त्यानंतर मनसेने आक्रमक होत केडिया यांचं ऑफिस फोडलं होतं, त्यानंतर केडिया यांनी माफी मागितली होती. त्यानंतर आज सुशील केडियाचं कार्यालय फोडणारे मनसैनिक राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झाले आहेत.
मनसे माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन गोळे यांच्यासोबत मनसे माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. सुशील केडियांच्या वरळी येथील कार्यालयावर मनसैनिकांनी नारळ फेकत आंदोलन केलं होतं. आंदोलनाप्रकरणी वरळी पोलिसांनी मनसैनिकांवर कारवाई केली होती. ते सर्व मनसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झाले आहेत.
नारळ फेकून फोडलं होतं सुशील केडिया यांचं ऑफिस
सुशील केडिया यांचं ऑफिस नारळ फेकून फोडण्यात आलं होतं. माथाडी कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडलं होतं, याची माहिती मनसे पदाधिकारी सचिन गोळे यांनी दिली होती. ”आम्ही केडियाचं ऑफिस फोडलं, उद्या घरी जायलाही घाबरणार नाही. सुशील केडियाला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही”, असा इशाराही गोळे यांनी दिला होता.
”मला माझ्या माथाडी कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, त्यांचं अभिनंदन करतो. केडिया नावाचा भेडिया गेली दोन दिवस गरळ ओकत आहे. राज साहेबांना त्याने आव्हान दिलं होतं. मराठी भाषेला आणि मराठी संस्कृतीला त्याने आव्हान दिलं होतं. मागील 30 वर्ष महाराष्ट्रात पैसे कमावतोय, मात्र त्याला मराठी येत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. अशा माणसांना मराठीचा अपमान करायचा असेल कर यासाठी ठोस कायदा तयार केला पाहिजे. नाहीतर राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिक अशांना धडा शिकवण्यासाठी तयार आहेतच, असं सचिन गोळे यांनी म्हटलं होतं.
मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चाची हाक मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवर मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चाची हाक दिली आहे. आज सकाळी बालाजी हॉटेल ते मीरारोड स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघणार आहे. मात्र पोलिसांनी या मोर्चाआधी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा जारी केल्या आहेत. काल रात्री साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं. तर वसई विरारमधीलही अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच असा ठाम पवित्रा मनसेने घेतला आहे. सध्या मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. कार्यकर्ते, नागरिक आणि पोलिस यांच्यामध्ये धरपकड सुरू आहे, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
