मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मीरा-भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावरुन शहरातील वातावरण तापलं आहे. मोर्चाला परवानगी नसली तरी आज मोर्चा काढण्यावर मनसे ठाम आहे. त्यामुळेच पहाटे साडेतीन वाजता मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यापाठोपाठ मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि राजू पाटील यांनाही नोटीसा बजावण्यात आल्या. व्यापाऱ्यांनी 3 जुलै रोजी काढलेल्या मोर्चाला परवानगी नसताना मोर्चा काढू दिला मग आम्हाला का नाही असा सवाल रस्त्यावर मोर्चासाठी उतरलेल्या मनसे कार्यकर्त्यांबरोबरच पदाधिकारी आणि नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रश्नाला थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
फडणवीसांनी सांगितलं कारण
फडणवीस यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सविस्तर माहिती दिली. ”मी पोलिसांकडे यासंदर्भात विचारणा केली की मनसेच्या मोर्चाला परवानगी का दिली नाही. मोर्चाच्या मार्गाबाबत चर्चा सुरू होती, असं सांगण्यात आलं. त्या मार्गावरून मोर्चा झाला असता तर संघर्ष झाला असता. पोलिसांनी मार्ग बदलावा असं म्हटलं होतं,” अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
सभेलाही परवानगी दिलेली पण…
”कुणालाही मोर्चा काढायचा असेल तर परवानगी मिळेल पण आम्हाला असाच मोर्चा काढायचा आहे तसाच काढायचा आहे असं चालणार नाही,” असं मुख्यमंत्र्यांनी मोर्चाला नकार देण्यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करताना सांगितलं. ”ते काल म्हणाले की आम्हाला सभा घ्यायची आहे. ती परवानगी देखील त्यांना दिली होती,” असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ”मोर्चा काढायला कुणालाही ना नाहीये. पण पोलिसांनी त्यांना सातत्याने सांगितलं होतं की तुम्ही मार्ग बदला,” असं फडणवीस म्हणाले.
मनसेच्या मोर्चाआधीच व्यापाऱ्यांचा बिनशर्त माफीनामा
मीरा-भाईंदरमधील वातावरण मनसेच्या मोर्चामुळे चांगलेच तापलेले असताना आता व्यापाऱ्यांनी 3 जुलैच्या मोर्चासंदर्भात माफी मागितली आहे. तसं पत्रच त्यांनी पोलीस उपायुक्तांना पाठवलं आहे. कोणत्याही समाजाच्या किंवा भाषिकांच्या भावना दुखावण्याचा आमचा प्रयत्न नव्हता. तरीही कोणाला वाईट वाटलं असेल तर आम्ही क्षमा याचना करतो असं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे. पोलिसांना पाठवलेल्या पत्रामध्ये मीरा-भाईंदर व्यापारी संघाच्यावतीने पत्र पाठवण्यात आलं आहे.
पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना व्यापाऱ्यांनी लिहिलेल्या पत्राचा विषय ‘कोणाच्या भावना दुखावल्या असतील त्याबाबत’ असा आहे. आमच्या व्यापारी संघाकडून 3 जुलै 2025 रोजी जमा झालेल्या व्यक्तीकडून कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी आमच्या व्यापारी संघाच्या वतीने आम्ही क्षमा याचना करतो. आमचा उद्दीष्ट फक्त आणि फक्त व्यापारी संघामधील भीतीचे वातावरण दूर करणे व पुन्हा आमच्यावर अशाप्रकारे हल्ले होऊ नये या करिता होता, असं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे.
