Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

नोकरी मागण्यासाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलींच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका 62 वर्षीय व्यावसायिकाला साकिनाका पोलिसांनी अटक केली. आरोपीने या मुलीची अश्लील छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना मारहाणही केली होती.

आरोपी प्रफुल्ल लोढा (62) याचा व्यवसाय आहे. त्याच्याकडे 16 वर्षीय पीडित मुलगी नोकरी मागण्यासाठी गेले होती. चकाला येथील लोढा हाऊस येथे 4 जुलै रोजी आरोपीने मुलीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीच्या 16 वर्षीय मैत्रिणीवरही त्याने अशा प्रकारे लैंगिक अत्याचार केला होता. नोकरी न देता दोन्ही मुलींची अश्लील छायाचित्रे प्रसारित (व्हायरल) करण्याची धमकी दिली. याबाबत दोन्ही मुली जाब विचारण्यासाठी गेल्या असता आरोपी लोढाने दोन्ही मुलीना माराहण केली. तसेच पीडित मुलीच्या मैत्रिणीला लोढा हाऊसमध्ये डांबून ठेवले होते.

याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी आरोपी प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 352 (2), तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यातील (पोक्सो) कलम 4, 8 अनव्ये गुन्हा दाखल केला. साकिनाका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपी लोढाला अटक केली.