Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

सध्या राज्यात हिंदी विरुद्ध मराठी भाषा असा मुद्दा रंगला आहे. त्यानिमित्तानं कित्येक वर्षांपासून दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र आले सरकारनं जारी केलेल्या हिंदी सक्तीच्या जीआरचा कडाडून विरोध केला. पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचा जीआर राज्य सरकारनं तीव्र विरोधामुळे मागे घेतला होता. पण, त्यानंतर पुन्हा नवा जीआर काढून त्यात हिंदी सक्तीची नसली तरी पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवण्यात आलं. त्यामुळे मागच्या दारानं हिंदी सक्ती केल्याचा आरोप केला जाऊ लागला. त्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटानं मराठीसाठी झेंडा बाजूला ठेवून मोर्चाची हाक दिली, पण राज्य सरकारनं मोर्चापूर्वीच जीआर रद्द केला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी वरळीत विजय मेळावा घेतला. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला विराट गर्दी वरळीत जमल्याचं पाहायला मिळालं.

एकीकडे चर्चा रंगलेली मराठी अस्मितेसाठी हेवेदावे बाजूला सारुन एकत्र आलेल्या ठाकरें बंधूंची… तर दुसरीकडे चर्चा होती, एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्याची. मराठी माणसला आधी मेहनत करायला शिकवा, असं वक्तव्य प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनंच केल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं. पण, तेवढ्यात अभिनेत्रीनं माफी मागून सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा नेटकऱ्यांकडून अभिनेत्रीवर प्रचंड टीकेची झोड उठवली गेली.

मुंबई उपनगरातील वर्सोवात राहणारी मराठी अभिनेत्री राजश्री मोरेनं इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केलेला. त्यामध्ये तिनं मराठी लोकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं. राखी सावंतची सख्खी मैत्रीण असलेली राजश्री मोरे व्हिडीओमध्ये म्हणालेली की, ”मराठी माणसांना मेहनत करायला शिकवा, काम करण्याची मानसिकता मराठी माणसांमध्ये नाही आहे…” तसेच, या व्हिडीओमध्ये बोलताना तिनं परप्रांतीय मुंबई सोडून गेले तर मराठी माणसांची अवस्था बिकट होईल, असं वक्तव्यही केलं होतं.

मराठमोळी अभिनेत्री राजश्री मोरेनं शेअर केलेला व्हिडीओ फार कमी वेळातच प्रचंड व्हायरल झाला. यानंतर मनसैनिकांनी थेट ओशिवरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या सर्व घडामोडींमुळे राजश्रीवर दबाव वाढला, आणि अखेर तिला सार्वजनिक माफी मागावी लागली. इतकंच नाही, तर तिला तो वादग्रस्त व्हिडिओ तात्काळ डिलिट करण्याचे निर्देशही देण्यात आले.

तक्रार दाखल होईपर्यंत राजश्री मोरे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलेली. राजश्रीला नेटकऱ्यांनी सळो की पळो करुन सोडलेलं. अखेर राजश्री मोरेनं सोशल मीडियावर माफी मागितली आणि वादग्रस्त व्हिडीओही काढून टाकला. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर माफी मागतानाचा एक नवा व्हिडीओ पोस्ट करत तिनं कॅप्शनमध्ये लिहिलेलं की, ”लढाईमध्ये काहीही ठेवलेलं नाही… आयुष्य खूपच लहान आहे.”