Spread the love

भाजपच्या प्रसाद लाड यांचं ठाकरे बंधूंना ओपन चॅलेंज

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मराठीच्या मुद्द्‌‍यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख राज ठाकरे हे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वतुर्ळात पडसाद उमटताना दिसत आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महायुतीच्या गोटातून प्रत्युत्तर द्यायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत लाडके आणि आदरणीय असलेल्या राज ठाकरे यांना भाजपच्या नेत्यांनी प्रत्युत्तर द्यायला आणि जाब विचारायला सुरुवात केली होती. यामध्ये भाजपचे आमदार प्रसाद लाड हे आघाडीवर आहेत. त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना डिवचत आमनेसामनेच्या लढाईचे आव्हान दिले आहे. ते सोमवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना ललकारत समोरासमोरच्या लढाईचे आव्हान दिले. आम्ही वाटच बघतोय, दोन भाऊ एकत्र येऊ द्या, होऊ द्या महासंग्राम. दोन भाऊ काय पुतणे, भाचे आणि अजून चार भाऊ हे सगळे एकत्र येऊ द्या, आम्ही तयार आहोत. विजयी मेळाव्यात  उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भाषणात फरक होता. उद्धव ठाकरे मराठीबद्दल काय बोलले, सगळं मराठी सोडून ‘गद्दा’र, ‘धोका’, ‘खंजीर’ हे शब्द त्यांनी भाषणात वापरले, असे प्रसाद लाड यांनी म्हटले.

भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे तयार आहोत. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना सोबत घेत आहेत. पण ज्याप्रकारे उद्धव यांनी राज ठाकरे यांचा अपमान केला होता. या सगळ्याबद्दल उद्धव ठाकरे हे  राज यांची माफी मागणार का?, असा सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला. मराठी भाषेबद्दल सगळ्यांना अभिमान आहे. मराठी भाषेत बोललं पाहिजे, पण एखाद्याला मराठी येत नसेल  हिंदी भाषिकांना मराठी बोलण्याची दादागिरी त्याला मारहाण करणं हे योग्य नाही, असे मतही प्रसाद लाड यांनी मांडले. यावर आता मनसे आणि ठाकरे गटाचे नेते काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतेच टीकास्त्र सोडले होते. दोन्ही ठाकरे बंधूंच्या भाषणात अप्रामाणिकपणा होता. उद्धव यांच्या भाषणात तडफफड दिसत होती. दोघांनीही देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानायला पाहिजे होते. राज ठाकरे यांची रस्त्यावर सत्ता असेल तर त्यांनी तिथे गोट्या खेळाव्यात, अशी बोचरी टीका आशिष शेलार  यांनी केली होती.