मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा भव्य विजयी मेळावा शनिवारी (दि. 5) मुंबईतील वरळी डोममध्ये पार पडणार आहे. या ऐतिहासिक मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. ठाकरे बंधूंच्या या मेळाव्यावरून मंत्री नितेश राणे यांनी ‘जिहादी सभा’ असा उल्लेख केला होता. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
छोट्या पोरांकडे लक्ष द्यायचं नसतं, बेटा काय बोलायचं ते बोलून घे, असे म्हणत त्यांनी सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. तर मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, नितेश राणे हे काल-परवा हिंदू झालेले आहेत. 2014 च्या आधी तेच टोपी घालून फिरायचे. ज्या माणसांनी त्यांना निवडून आणलं, त्यांनाच ते आम्हाला मारायला सांतग आहेत. तो माणूस उद्या हिंदू लोकांना का नाही मारायला सांगणार? त्यांच्यावर भरोसा ठेवू नका. हा काल-परवा हिंदू झालेला माणूस आहे, असा हल्लाबोल त्यांनी केलाय. तसेच, मनसे नेते प्रकाश महाजन यांनी देखील नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल केलाय. हा कधी हिंदूंचा नेता झाला? हा तर संघाला हाफ चड्डीवाले म्हणत होता, हा कधी झाला, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी वरळी डोममध्ये ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी झाली आहे. अगदी अलीकडेपर्यंत एकमेकांच्या वाऱ्यालाही उभे न राहणारे ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते वरळी डोममध्ये सध्या आनंदाने एकमेकांच्या गाठीभेटी घेत आहेत. एकमेकांना पेढे भरवत आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर हे सगळे एकमेकांपासून दूर झाले होते. मात्र, आता ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्त्यांनाही आनंद झाला आहे. त्यामुळे वरळी डोममध्ये सध्या अनोखे चित्र पाहायला मिळत आहे.
