Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

उद्धव आणि मी 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायला, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, अशी मार्मिक टिप्पणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली. ते शनिवारी वरळी डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमात राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंचे मनोमिलन होताना दिसले. यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांना संबोधित केले.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सन्माननीय उद्धव ठाकरे, अशी केली. यानंतर त्यांनी आपले नेहमीचे माझ्या तमाम मराठी माता बंधू आणि भगिनींनो हे नेहमीचे वाक्य उच्चारले. राज ठाकरे यांनी म्हटले की, आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस सर्व बाजूंनी कसा एकवटतो, हे चित्र त्यांना दिसले असते. पण फक्त मोर्चाच्या घोषणेनेच यांनी माघार घेतली, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय सरकारने कोणासाठी घेतला? कोणाला विचारायचं नाही, शिक्षणतज्ज्ञांना काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, बहुमत आहे, आम्ही निर्णय लादणार. पण तुमच्या हातात सत्ता असेल तरी विधानभवनात. आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर. हिंदी सक्तीच्या विरोधात मी सरकारला पत्रं लिहली. नंतर दादा भुसे माझ्याकडे आले. मला म्हणाले की, आम्ही काय म्हणतोय, ते समजून तर घ्या, ऐकून तर घ्या. मी त्यांना म्हटलं दादा तुम्ही काय सांगताय ते ऐकून घेईन, पण ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्रं कुठून आणलं? ते केंद्र आणि राज्य सरकारमधील दुव्यासाठी आणलं. हायकोर्टात आणि इतर सगळीकडे दैनंदिन व्यवहार इंग्रजी भाषेत होतात, मग त्रिभाषा सूत्राची गरज काय? दक्षिणेत  हे त्रिभाषा सूत्र नाही, मग यांनी महाराष्ट्रात प्रयोग करुन पाहिला. पण महाराष्ट्र पेटून उठतो त्यावेळी काय होतं, हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली. विनाकारण आणलेला विषय होता, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

हिंदी भाषिक राज्य आर्थिकदृष्ट्‌‍या मागास आहेत आणि हिंदी न बोलणारी राज्य आर्थिकदृष्ट्‌‍या प्रगत आहेत आणि वर आम्ही हिंदी शिकायचं. यांना हिंदीतून राज्याचा विकास करता आला नाही. हिंदी भाषक राज्यातून लोकं इकडे नोकरीसाठी येत आहेत आणि हे बोलतात हिंदी शिका, मग हिंदी कोणासाठी शिकायचं?, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. अमित शाह म्हणतात, भविष्यात ज्याला इंग्रजी येईल, त्याला लाज वाटेल. पण त्यांनाच स्वत:ला इंग्रजी येत नाही येत. मराठा साम्राज्य अटकेपार पोहोचले होते. मराठ्यांनी सव्वाशे वर्षे आम्ही राज्य केलं, पण आम्ही मराठी लादली का?, असा सवाल राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात विचारला.