Spread the love

बीड / महान कार्य वृत्तसेवा

बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. इथं एका तरुणाने आईसोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. नराधमाने लोखंडी पाईपने मारहाण करत जन्मदातीला संपवलं आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्या भावजयीला देखील जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

दत्ता बांगर असं आरोपी मुलाचं नाव आहे. तर सुवर्णमाला बांगर असं हत्या झालेल्या आईचं नाव आहे. घटनेच्या दिवशी सुवर्णमाला ह्या आपल्या घरासमोर बसल्या होत्या. यावेळी मुलगा दत्ता याने घरात जाऊन लोखंडी पाईप आणला आणि जन्मदात्या आईला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी आरोपीनं आईच्या डोक्यात गंभीर घाव घातले. हे वार इतके भयंकर होते, की सुवर्णमाला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.

आरोपीनं ही मारहाण आपल्या लहान मुलाच्या डोळ्यादेखत केली आहे. यावेळी आरोपीच्या भावजयीने आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने भावजयीला देखील जीवे मारण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच जखमी सुवर्णमाला यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा दत्ता बांगर याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. मुलानेच आपल्या आईची अशाप्रकारे निर्घृण हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.