Spread the love

सोलापूर / महान कार्य वृत्तसेवा

पंढरपूरची आषाढी वारी काही दिवसांवर आली असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. या धडक मोहिमेत तब्बल 14 लाख 45 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वारकरी सांप्रदायाची शिस्त आणि पावित्र्य राखण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पथकांनी अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रे, अवैध देशी-विदेशी मद्य विक्री, वाहतूक आणि बेकायदेशीर धाब्यांवर लक्ष केंद्रित केले होते. विभागीय उपायुक्त सागर धोमकर आणि अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.

नेमके काय जप्त झाले?

या कारवाईत एकूण 15 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात 9550 लिटर रसायन, 235 लिटर हातभट्टी दारू, 194.22 लिटर देशी मद्य, 30.24 लिटर विदेशी मद्य, 78 लिटर बिअर आणि एक चारचाकी वाहनाचा समावेश आहे. या सर्व जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 14 लाख 45 हजार 400 रुपये इतकी आहे.

गेल्या एका महिन्यात 229 गुन्हे दाखल!

केवळ आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरच नाही, तर 1 जून ते 30 जून 2025 या कालावधीतही सोलापूर शहर आणि जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने सातत्याने कारवाई केली आहे. या एका महिन्यात एकूण 229 गुन्हे नोंदवून 214 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

या मोठ्या मोहिमेत 65,550 लिटर रसायन, 5793 लिटर हातभट्टी दारू, 499 लिटर देशी मद्य, 128 लिटर विदेशी मद्य, 102.32 लिटर बिअर, 2467 लिटर ताडी, 1260 लिटर गोव्यातील बनावट विदेशी मद्य आणि 27 वाहने जप्त करण्यात आली आहेत. या सर्व जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 1 कोटी 3 लाख 37 हजार 238 रुपये इतकी आहे.

याशिवाय, अवैध मद्यविक्री आणि मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या 27 धाब्यांवरही गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात आली आहे.

अवैध मद्यविक्री, निर्मिती आणि वाहतुकीविरोधातील ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली आहे. तुम्हाला कुठेही अवैध मद्याची माहिती मिळाल्यास, टोल फ्री क्रमांक 18002339999 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधून माहिती देऊ शकता. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.