Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

राज्यात मराठी शाळांची अवस्था वाईट झाली आहे, मराठी शिकवायला शिक्षक नाहीत. मग हिंदी शिकवण्यासाठी भैया कुठून आले? असा परखड सवाल मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी केला. आताचा हिंदी सक्तीचा निर्णय हा मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून नाही तर नागपूरच्या रेशीमबागेतून झाल्याची टीकाही त्यांनी केली. पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याला विरोध करत आपण 5 जुलैच्या मुंबईतील मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचंही दीपक पवार यांनी जाहीर केलं.

मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्था यांच्या वतीने प्राथमिक शिक्षणातील तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात शासन निर्णयांची प्रतिकात्मक होळी आणि जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी मनसेचे नितीन सरदेसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार अरविंद सावंत, मार्क्‌‍सचे शैलेश कांबळे, वंचितच्या दिशा पिंकी शेख, कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी, आपचे मुकुंद किर्दत उपस्थित होते.

काय म्हणाले दीपक पवार?

गेल्या 40 वर्षात झालं नाही ते आज झालं. राजकिय पक्ष आणि नागरी चळवळीसाठी काम करणारे लोक मराठी विषयावर एकत्र येऊन काम करत आहेत. 16 एप्रिलला पहिला शासन निर्णय आला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की लोकांचे इंग्रजी प्रेम वाढलं आहे. इंग्रजी महाराष्ट्रात अनिवार्य करू नये हे आम्ही म्हणत होतो. त्यावेळी आमच्यावर आरोप झाला की हे बाह्मण आहेत आणि यांना बहुजन मुले शिकलेली आवडत नाहीत. त्यावेळी आता जे पाशवी बहुमत मिळालेले सरकार आहे तेच सत्तेत होतं.

सध्या मराठी शिकवायला लोक नाहीत आणि सरकार म्हणत आहे की हिंदी शिकवायला आमच्याकडे खूप लोक आहेत. मग हे मराठी भैया कुठून आले? 1947 नंतर काय लपून राहिले होते का?

राहुल रेखावार यानेच सगळं घडवलं

राहुल रेखावार हा बदमाश आयएएस अधिकारी आहे. त्याने हे सगळं घडवून आणलं आहे. हा कुणाचा तरी जावई आहे, हा मराठीच्या मुळावर उठला आहे. कृष्णकांत पाटील नावाचा आणखी एक अधिकारी आहे, त्याला पाठीचा कणा नाही. सध्याचे पाटील असेच आहेत, पाठीचा कणा नसणारे.

सध्याचे सरकार हे सगळं रात्रीचं काम करत आहे. त्यांना रात्रीत खूप इंटरेस्ट आहे. शपथ हे रात्री घेतात, हिंदी सक्तीसाठी देखील रात्रीत जीआर काढला आहे.

शिक्षणमंर्त्याला काहीही समजत नाही

सरकारमधे दोन स्वाभिमानी पक्ष आहेत. एक गुवाहाटीमार्गे पळून आलेला पक्ष आहे. त्यांच्या पक्षाचा शिक्षणमंत्री आहे ज्याला त्याच्या खात्यातील काहीही कळत नाही. तो केवळ राहुल रेखावारच्या तालावर बोलणारा पोपट आहे.

आम्ही केवळ जीआर जाळले. पुढे जाऊन हिंदी भाषेची लाखो पुस्तके जाळू. 5 तारखेला जो मोर्चा निघणार आहे तो राजकीय पक्षांचा ठरत आहे. आम्ही त्यात सहभागी होणार आहे. 7 जुलैपासून आम्ही आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहोत.

सध्याचे निर्णय हे रेशीमाबागेतून

आता जे काही निर्णय होत आहेत, ते मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून नाही तर संघाच्या रेशीमबागेतून होतं आहेत. गोळवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट्‌‍स’ मधून येत आहेत. ‘एक भाषा एक देश’ असे त्यांचे धोरण आहे. आमच म्हणणं आहे की दहावीपर्यंत हिंदी नको. अजित पवार म्हणतात की पाचवीपर्यंत हिंदी नको. आता आम्हाला हे कळेना की ते सत्तेत आहेत की आम्ही?