Spread the love

भंडारा / महान कार्य वृत्तसेवा

बोगस शालार्थ आयडी तयार करून शिक्षकपदी नियुक्ती केल्याप्रकरणी सदर पोलिसांनी अटक केलेल्या चेतक राजेश डोंगरे (44), सदानंद कोठीराम जांगडे (45) आणि गंगाधर नत्थू डोंगरे सर्व रा. गोसे बु. (पवनी), भंडारा यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

या आरोपींनी या घोटाळ्याचा मुख्य आरोपी महेंद्र म्हैसकर याच्यासोबत कट रचून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. गोसे बु. (ता. पवनी) येथील विनोद शिक्षण संस्था, विनोद हायस्कूल व कनिष्ठ कला, विज्ञान महाविद्यालयाचा मुख्य सचिव चेतक डोंगरे याला मुख्य सचिव व मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात आला. तसेच चेतकचा काका गंगाधर हा याच संस्थेत सचिव म्हणून आहे. राजेश डोंगरेने 2018 मध्ये सदानंद जांगडे याची शिक्षकपदी नियुक्ती करण्यासाठी वैयक्तिक प्रस्ताव विभागाला पाठविला. बोगस आयडी तयार करून त्याला शिक्षकपदी नियुक्ती देण्यात आली.

मात्र, शिक्षण उपसंचालक कार्यालयात सदानंद जांगडे याचा प्रस्तावच नाही. तशी आवक-जावकमध्ये कुठेच नोंद नाही, तर मग त्याची शिक्षक पदी नियुक्ती कशी केली? सदर पोलिसांनी म्हैसकरला अटक केल्यानंतर त्याच्याकडून अनेक शिक्षण संस्थांची कागदपत्रे जप्त केली होती. त्यातील विनोद शिक्षण संस्थेचा अहवाल सदर पोलिसांना प्राप्त झाला. त्याच अहवालावरून सदरचे ठाणेदार मनीष ठाकरे आणि त्यांच्या पथकाने भंडाऱ्याला जाऊन मुख्य सचिव, सचिव आणि बोगस शिक्षकाला अटक केली. आरोपी चार दिवस कोठडीत राहणार आहेत.

अध्यक्षाला अटक केव्हा?

शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा पार्वता राजेश डोंगरे (75) यांना अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. बोगस शिक्षकांच्या नियुक्तीबाबत पार्वता डोंगरे यांनीच निर्णय घेतला होता. त्यामुळे बोगस शिक्षकांच्या भरतीस पार्वता डोंगरे जबाबदार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.