Spread the love

छत्रपती संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये चिंचडगाव शिवारात महिला कीर्तनकाराच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला. शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास हभप संगीताताई अण्णासाहेब पवार (50), असे मृत कीर्तनकार महिलेचे नाव आहे. आश्रमात घुसून मारेर्कयांनी कीर्तनकार महिलेला डोक्यात दगड घालून संपवले. दरम्यान या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. हभप संगीता महाराज यांना एप्रिल महिन्यात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.  वैजापूर पोलीस ठाण्यात तशी तक्रारही देण्यात आली होती. जागेच्या वादातून शेजाऱ्यांशी भांडण असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मी एकटी राहते मला मारून टाकतील अशी धमकी दिल्याचे संगीता महाराज यांनी सांगितले होते.

दगडाने ठेचून हत्या, प्राथमिक तपासात समोर

शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिरात पुजारी शिवाजी चौधरी नेहमीप्रमाणे पूजेसाठी आले होते. त्यावेळी हभप संगीताताई पवार यांना आवाज दिल्यानंतर ही प्रतिसाद न आल्याने मंदिराशेजारी असणाऱ्या शेडमध्ये जाऊन बघितले असता रक्ताच्या थारोळ्यात संगीताताई पडलेल्या होत्या.  संगीता ताई पवार झोपलेल्या असताना डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे .त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून शवविच्छेदन आणि फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे .

जीवे मारण्याची धमकी

संगीताताई पवार या भागवत कथेसाठी 2009 आणि 2010 साली दोन वर्ष वृंदावनला राहिलेले आहेत .भागवत कथेची पूर्ण तयारी करून ते इथे आल्या . सहा महिन्यांपूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमा केली .दरम्यान आश्रमासाठी पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी जागा घेतली होती .या जागेवर त्या दोन महिन्यांपासून स्थायिक झाल्या होत्या . दरम्यान नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात जागेच्या वादावरून शेजाऱ्यांशी त्यांचे भांडण झाल्याने संगीता महाराज यांना जीवे मारण्याची धमकी आली होती .वैजापूर पोलीस ठाण्यात तशी तक्रारही त्यांनी दिली होती .शनिवारी सकाळी त्यांची हत्या झाली . त्यानंतर विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली . घटनेचा पुढील तपास सुरू आहे .

आरोपींना लवकरात लवकर अटक करावी

याबाबत स्थानिक आमदार रमेश बोरनारे म्हणाले की, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. जेव्हा मला याबाबत माहिती मिळाली तेव्हा मी तत्काळ या ठिकाणी आलो. सर्व पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेले आहे. लवकरात लवकर आरोपीला अटक करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.