oppo_2
Spread the love

जनजीवन विस्कळीत : शेती धोक्यात अनेक ठिकाणी शेतीच्या मशागती झालेल्या नाहीत 

कोगनोळी / महान कार्य वृत्तसेवा (विठ्ठल कोळेकर) 

संततधार पडणाऱ्या पावसामुळे सध्या संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. जूनच्या मध्यावरच दूधगंगा नदी दुसऱ्यांदा पात्रा बाहेर गेल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. यामुळे शेती व शेती वरती अवलंबून असणाऱ्या बळीराजाची जीवन खूप अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले आहे. अजूनही काही ठिकाणी पेरणीपूर्व शेतीच्या मशागतीच झालेल्या नाहीत, त्यामुळे यावेळी चा शेतीचा सीजन वाया तर जाणार नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतीतील पेरणीपूर्व मशागतीला प्रेरणा मिळेल, असे वाटत असताना संततदार पाऊस हा थांबण्याचे नावच घेतला नाही. त्यामुळे मे च्या सुरुवातीपासून ते जूनच्या मध्यापर्यंत सध्या नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत. दूधगंगा नदी सध्या दुसऱ्यांदा पात्रा बाहेर पडलेली आहे. यामुळे अनेक विद्युत पंप टीसी पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

पेरणीपूर्व मशागतीच्या कामाचा अजून मागमूसही झालेला नाही, त्यामुळे शेतीमध्ये मशागत कधी करायची त्याच्यामध्ये पेरणी कधी करायची हा मोठा यक्षप्रश्न आता बळीराजासमोर उभारलेला आहे. जर संततदार पाऊस असाच सुरू राहिला तर हा सीजन वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जूनच्या मध्यावरतीच अनेक विहिरी तुडुंब भरून वाहत आहेत, तर काही बोरवेलचे पाणी विद्युत पंप सुरू न करता सुद्धा बाहेर पडताना दिसत आहे.

संततदार पडणारा पाऊस हा जरी सध्या माळरानातील ऊस या पिकांना दिलासा देणारा असला तरी भुईमूग सोयाबीन उडीद किंवा अन्य पिके पेरण्यासाठी अद्याप काही ठिकाणी शेतीमध्ये मशागती झालेल्या नाहीत, त्यामुळे मशागती करण्यासाठी तरी पाऊस थांबणार का हे अद्याप स्पष्ट दिसून येत नाही.

जनजीवन विस्कळीत 

संततधार पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले असून ठीक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य काही ठिकाणी छोटे-मोठे उड्यावरील पूल पाण्याखाली जाणे तसेच शाळा व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून शाळा सुट्टी देण्या इतपत परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेती मशागतीमध्ये काम करण्यासाठी वातावरण पोषक नाही, नदीकाठची ऊस भात किंवा तत्सम पिके पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे सर्वच बाबतीत जनजीवन ठप्प झाले असून या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांसह अन्य क्षेत्रातील व्यक्तींचे जनजीवन ही विस्कळीत झाल्याची दिसून येत आहे.