मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू कायरन पोलार्ड आपल्या विस्फोटक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कायरन पोलार्ड जगभरातील विविध लीगमध्ये खेळताना दिसत आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून अनेक कमालीचे सामने खेळल्यानंतर आता तो संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहे. सध्या तो मेजर क्रिकेट लीगमध्ये खेळत असून त्याने एक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
23 जूनला सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स विरुद्धच्या मेजर लीग क्रिकेट सामन्यात एमआय न्यू यॉर्ककडून मैदानात उतरताना कायरन पोलार्डने इतिहास रचला. त्याने टी-20 क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव पहिल्या स्थानी नोंदवलं आहे. टी-20 क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे केलेला पोलार्ड अमेरिकेतील टी-20 लीगमध्ये निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.
एमआय न्यू यॉर्क ही मुंबई इंडियन्स (एमआय) ची या स्पर्धेतील फ्रँचायझी आहे, जी 2008 मध्ये आयपीएलच्या सुरूवातीपासन आयपीएलचा भाग आहे. पोलार्ड 2010 ते 2022 पर्यंत एमआयकडून खेळला. आयपीएल 2023 पूर्वी त्याने इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती घेतली.
पोलार्डने एमआय न्यू यॉर्ककडून खेळताना एक विश्वविक्रम रचला आणि 700 टी-20 खेळणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळलेला पोलार्ड 700 सामन्यांच्या टप्यापासून फक्त एक सामना मागे होता. या स्टार अष्टपैलू खेळाडूच्या नावे टी-20 क्रिकेटमध्ये 13668 धावा आणि 328 विकेट आहेत.
पोलार्डनंतर सर्वाधिक टी-20 सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ड्वेन ब्राव्हो आहे. ज्याने 582 टी-20 सामने खेळले आहेत. शोएब मलिक तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावे 557 टी-20 सामने आहेत. आंद्रे रसेल 556 आणि सुनील नरेन 551 सामन्यांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
वेस्ट इंडिजकडून खेळताना कायरन पोलार्डने 101 टी-20 सामने खेळले. यादरम्यान 1569 धावा आणि 42 विकेट्स घेतले होते. वेस्ट इंडिजचे नेतृत्त्व करणाऱ्या पोलार्डने 2022 मध्ये निवृत्ती जाहीर केली. टी-20 व्यतिरिक्त त्याने 123 एकदिवसीय सामने देखील खेळले. पोलार्डने 2007 ते 2015 दरम्यान फक्त 27 प्रथम श्रेणी सामने खेळले.
