Spread the love

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

कोकण आणि घाट परिसरात गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम आहे. सध्या पावसाळी पर्यटनासाठी अनेकजण डोंगरी किल्ले आणि सह्याद्रीतील निसर्गरम्य ठिकाणी जात असतात. पुणे जिल्ह्यातील डोंगराळ भागात मुसळधार पाऊस सुरू असून दरड कोसळण्याचा आणि निसरड्या रस्त्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राजगड, तोरणा, मढेघाट तसेच विविध धरण परिसरात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील राजगड, तोरणा, मढेघाट तसेच विविध धरण परिसरात पर्यटकांना बंदी करण्यात आली असून ही बंदी तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत हे पर्यटकांसाठी बंदीचे आदेश लागू राहणार आहेत.

सदर पर्यटनस्थळांवर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होते. मात्र, यंदा अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. पायवाट निसरड्या झाल्या आहेत आणि काही भागांत भूस्खलनाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही बंदी लावण्यात आली आहे, असे भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी सांगितले.

या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि भारतीय दंड संहितेनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी आणि पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षितता हीच प्राथमिकता मानत प्रशासनाने घेतलेला हा निर्णय आवश्यक असून नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.